मुंबई-
केंद्रीय निवडणूक आयोगानं शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण निवडणूक चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्याचा निर्णय घेतला. यामुळे उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला. पण या धक्क्यातून खचून न जाता पक्षाला सावरण्यासाठी आता उद्धव ठाकरे कामाला लागले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सध्या मुंबईतील शिवसेना भवनात पक्षाच्या जिल्हाध्यक्षांची बैठक सुरू आहे. या बैठकीत उद्धव ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आणि जिल्हाध्यक्षांना मार्गदर्शन करत आहेत.
आपल्या हातातून आता पक्षाचं नाव आणि चिन्ह गेल्यानंतर पुढची रणनिती आखण्याआधी पक्ष संघटना मजबूत करण्यावर ठाकरे कुटुंब भर देणार असल्याची माहिती समोर आली आहे. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे पक्षाच्या काही महत्वाच्या नेत्यांसोबत संपूर्ण महाराष्ट्र येत्या काळात पिंजून काढणार आहेत. यासाठीचं प्लानिंग केलं जात आहे. महाराष्ट्राच्या दौऱ्यासाठी नेत्यांची एक टीम तयार केली जात आहे. यात आपले गड मजबूत ठेवण्याचं काम ठाकरे गटाकडून करण्यात येणार आहे. पक्ष सध्या ज्या परिस्थितीचा सामना करतोय अशा काळात निवडणुकीला खंबीरपणे सामोरं जायचं असेल तर गाव-खेड्यापासून पक्ष मजबूत करावा लागेल अशी भावना नेत्यांनी व्यक्त केली आहे. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंचे महत्वाचे नेते महाराष्ट्र दौरा करणार असल्याचं समजतं.
येत्या काळात शिवसंपर्क अभियान आणखी वेगानं सुरू ठेवून संघटना मजबूत करण्यासाठी गाव पातळीवर अभियान राबवण्यात येणार आहे. यासाठीची चर्चा आजच्या बैठकीत झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. निवडणूक आयोगानं आपल्या बाजूनं निकाल दिला नसला तरी जनताच आपलं भविष्य ठरवणार आहे आणि तेच आपल्याला न्याय देतील या दृष्टीकोनानं ठाकरे गटानं आपला मास्टरप्लान तयार केल्याचं बोललं जात आहे.