छत्रपतींचा 'तो' पुतळा हटवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी केली डील; किरण पावसकरांचा गंभीर दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2024 04:21 PM2024-09-02T16:21:54+5:302024-09-02T16:27:39+5:30

राज्यात मालवण येथील शिवछत्रपतींचा पुतळा पडल्यानंतर महाविकास आघाडीकडून महायुती सरकारच्या नेत्यांना जोडे मारो आंदोलन घेण्यात आले होते. त्यावरून शिंदेंच्या शिवसेनेने हा खळबळजनक दावा केला आहे. 

Uddhav Thackeray struck deal with GVK company to remove statue of Chhatrapati Shivaji Maharaj from Mumbai airport - Kiran Pavaskar, Shiv Sena | छत्रपतींचा 'तो' पुतळा हटवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी केली डील; किरण पावसकरांचा गंभीर दावा

छत्रपतींचा 'तो' पुतळा हटवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी केली डील; किरण पावसकरांचा गंभीर दावा

मुंबई - मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव हे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे दिले गेले. मात्र विमानतळाजवळील महाराजांचा अश्वारुढ पुतळा हटवण्यास बाळासाहेबांचा विरोध असताना देखील उद्धव ठाकरे यांनी ‘GVK’ कंपनीशी डील केली. महाराजांचा पुतळा हटवून उबाठाने महाराष्ट्राच्या अस्मितेची केवळ कमिशनसाठी तडजोड केली असा खळबळजनक दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्याशिवसेना सचिव आणि प्रवक्ते किरण पावसकर यांनी केला. 

बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले की, मुंबई विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी जीव्हीके कंपनीने सहार पोलिस स्टेशन आणि महाराजांचा अश्वारुढ पुतळा हटवण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र याला बाळासाहेबांनी पहिला विरोध केला होता. याविषयी कंपनीशी देणंघेणं करण्यासाठी उद्धव ठाकरे गेले होते. छत्रपतींच्या नावाने तुम्ही किंमत विचारायला गेला होतात आणि ती किंमत तुम्ही घेतलीत असा थेट आरोप  पावसकर यांनी केला. मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत झालेला प्रकार दुर्देवी आहे. या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माफी मागितली, मात्र त्यावर उबाठा गटाकडून सुरु असलेले राजकारण निंदनीय आहे, अशी टीका पावसकर यांनी केली. 

तसेच स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या राहुल गांधी यांच्याकडे माफी मागण्याची हिंमत उबाठा यांनी का दाखवली नाही. भारत जोडो यात्रा काढणाऱ्यांना सावकरांचा अपमान केल्यावर गेट आऊट करण्याची धमक उद्धव ठाकरे यांनी का दाखवली नाही. छत्रपतींच्या नावाने राजकारण करणारे आज गळा काढत आहेत. लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी उबाठाचे प्रवक्ते महाराष्ट्रात दंगली उसळणार असे वारंवार सांगत होते. पण सरकारने असा कुठलाही प्रकार होऊ दिला नाही. परंतु आता पुन्हा उबाठा गटाचा खरा चेहरा समोर आल्याचं किरण पावसकर म्हणाले. 

दरम्यान, उबाठा गटाचे चंद्रकांत खैरे यांनी पुतळा दुर्घटनेनंतर राज्यात दंगली घडाव्यात  असे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. या वक्तव्यावरुन उबाठा गटाला महाराष्ट्रात दंगली घडवायच्या होत्या का असा प्रश्न उभा राहतो. त्यामुळे खैरे यांची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी किरण पावसकर यांनी केली. त्याशिवाय शिवचरित्राचे अभ्यासक दिवंगत बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवचरित्र लोकांपर्यंत पोहचावे म्हणून आयुष्य वेचले मात्र त्यांची बदनामी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी केली. पुरंदरेंचा मानसिक छळ केला. शरद पवार ४० वर्षांनंतर रायगडावर जाऊन आले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेमुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. ही योजना कशी बंद होईल, यासाठी विरोधक प्रयत्न करत आहेत असा आरोप शिवसेना सचिव किरण पावसकर यांनी केला. 

Web Title: Uddhav Thackeray struck deal with GVK company to remove statue of Chhatrapati Shivaji Maharaj from Mumbai airport - Kiran Pavaskar, Shiv Sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.