मुंबई-
राष्ट्रपतीपदासाठी एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना शिवसेनेनं पाठिंबा जाहीर केला आहे. याची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी शिवसेना भवनात आयोजित पत्रकार परिषदेत केली. शिवसेनेनं कधीच कोत्या मनानं वागलेली नाही. एका आदिवासी महिलेला राष्ट्रपतीपदाची संधी मिळत आहे तर आपण त्यांना पाठिंबा दिला पाहिजे अशी भावना खासदारांनी व्यक्त केली होती. त्याचा सन्मान करत शिवसेनेनं राष्ट्रपतीपदासाठी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
शिवसेनेच्या खासदारांनी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्यासाठी उद्धव ठाकरेंवर दबाव आणल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. यावरही उद्धव ठाकरे यांनी स्पष्टीकरण दिलं. "माझ्यावर खासदारांनी कोणताही दबाव आणलेला नाही. द्रौपदी मुर्मू या आदिवासी समाजाचं प्रतिनिधीत्व करतात. त्यामुळे आमच्या पक्षातील आदिवासी समाजाचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या नेत्यांनी एका आदिवासी उमेदवाराला देशाचं राष्ट्रपतीपद भूषवण्याची संधी मिळत असल्यामुळे आपण पाठिंबा द्यायला हवा अशी विनंती माझ्याकडे केली. शिवसेनेनं याआधीही पक्षीय अभिनिवेशन बाजून ठेवून प्रतिभाताई पाटील, प्रणब मुखर्जी यांना पाठिंबा दिला होता. त्यामुळे शिवसेना कधीच कोत्या मनानं वागलेली नाही", असं उद्धव ठाकरे म्हणाले.