मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून श्रीशिवप्रतिष्ठान (हिंदुस्थान) प्रमुख संभाजी भिडे यांचे कौतुक करत त्यांना समर्थन दर्शवले आहे. ''भिडे गुरुजींची जिद्द व हिंमत वाखाणण्यासारखी आहे. त्यांचा कणा ताठ व बाणा अफाट आहे. त्यांच्या वाणीला तलवारीची धार आहे. हिंदुत्व रक्षणाच्या बाबतीत भिडेगुरुजी हे सध्याच्या युगातील बाजीप्रभू देशपांडेच आहेत'', असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी संभाजी भिंडे गुरुजी यांना पाठिंबा दर्शवला आहे.
(पाकिस्तान नव्हे तर सुशिक्षित हिंदूंचाच देशाला जास्त धोका- संभाजी भिडे)
- काय आहे आजचे सामना संपादकीय ?संभाजी भिडे हे प्रखर हिंदुत्ववादी आहेत. त्यांचे सारे आयुष्य त्यांनी हिंदुत्व आणि शिवरायांच्या कारणी लावले व सातारा, सांगली, कोल्हापूर भागात तरुणांना प्रेरणा देऊन संघटन बनवले. नगर येथील एका सभेत भिडे गुरुजी यांनी तरुणांना असे आवाहन केले की, हाती तलवारी घेण्याची वेळ नक्कीच येणार आहे, तयार रहा. तरुणांच्या हाती तलवारी का हव्यात, तर रायगडावर शिवप्रतिष्ठानतर्फे सुवर्णसिंहासन उभारले जाईल. त्या सिंहासनाच्या रक्षणासाठी दोन हजार धारकऱयांची फौज तयार राहील व ती सशस्त्र्ा राहील अशी एकंदरीत योजना दिसते. भिडे गुरुजी यांच्याविषयी आम्हाला कमालीचा आदर आहे. हिंदुत्वासाठी त्यांची अखंड धडपड सुरूच असते. हिंदुत्व, छत्रपती शिवराय व छत्रपती संभाजीराजे यांच्याविषयी कुणाची जीभ घसरलीच तर त्यांचा समाचार घेण्यासाठी भिडे गुरुजी उसळून उभे राहतात. त्या अर्थाने ते शिवसेनाप्रमुखांचे ‘धारकरी’ आहेत. काही प्रसंगी भिडे गुरुजी हे ‘मातोश्री’वर येऊन शिवसेनाप्रमुखांना भेटलेही आहेत. ते आमच्याशीही बोलत असतात. हिंदुत्व रक्षणाच्या बाबतीत भिडेगुरुजी हे सध्याच्या युगातील बाजीप्रभू देशपांडेच आहेत. म्हणूनच हाती तलवारी वगैरे घेऊन लढण्याची गर्जना त्यांनी केली आहे. भिडे गुरुजींना ही जय्यत तयारी करावीशी वाटत आहे.
(माझ्या शेतातला आंबा खाल्ल्याने जोडप्यांना मुलं होतात- संभाजी भिडे)म्हणजेच कोणत्या तरी संकटाची जाणीव त्यांना अस्वस्थ करीत आहे. त्यामुळेच हातात तलवारी घ्याव्या लागतील असे ते म्हणाले. अर्थात तलवारींचा जमाना आता मागे पडला आहे व ‘एके ५६’च्या पुढे आपण पोहोचलो आहोत. भीमा-कोरेगाव दंगलीचे जे पाच-सहा माओवादी सूत्रधार पुणे पोलिसांनी पकडले आहेत त्यांची मजल तर फारच पुढे गेली आहे. लाखभर राऊंड फायर होतील अशी शस्त्र मिळविण्याच्या तयारीत ते आहेत व त्यासाठी सात-आठ कोटी रुपये जमा झाल्याची माहिती पुणे पोलिसांनी न्यायालयात दिली आहे. अशा लोकांपुढे आपल्या तलवारी कशा टिकणार? जरी भिडे गुरुजींना धर्मांध दहशतवाद्यांविरुद्ध लढायचे असले तरीही तलवारीचा उपाय चालणार नाही. कश्मीरातील फुटीरतावाद्यांकडे आमच्या सैन्यासारखाच शस्त्र्ासाठा आहे. त्यांच्याकडे बंदुका, रॉकेट लाँचर्स, बॉम्ब आहेत. त्यांचा वापर ते आपल्याविरुद्ध करीत आहेत. या सगळय़ांशी तलवारीचे युद्ध होऊ शकेल काय? नक्षलवाद्यांकडेही आधुनिक शस्त्र आहेत व तलवारी मागे पडत आहेत. स्वतः स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लेखकांना ‘‘लेखण्या मोडा व बंदुका हाती घ्या’’ असे आवाहन ७५ वर्षांपूर्वी केले होते. त्यांच्याही डोळय़ांसमोर तलवारी नव्हत्या. कश्मीरातील अतिरेक्यांशी लढण्यासाठी हिंदू तरुणांना हाती ‘एके-४७’ घ्याव्या लागतील, असे शिवसेनाप्रमुखांनी ठणकावले होते वहिंदूंनी आत्मघातकी पथक म्हणजे ‘मानवी बॉम्ब’ बनवून हल्ले करावेत अशी भूमिकाही तेव्हा घेतलीच होती. त्यामुळे तलवारीच्या पुढे जाऊन विचार करणे गरजेचे आहे.
भिडे गुरुजींची जिद्द व हिंमत वाखाणण्यासारखी आहे. त्यांचा कणा ताठ व बाणा अफाट आहे. भीमा-कोरेगाव प्रकरणात हे दिसले. त्यांच्या वाणीला तलवारीची धार आहे. त्याच तलवारीच्या धारेवरून त्यांचा प्रवास सुरू असतो, पण दुश्मनांच्या हातात तलवारी नसून बंदुका आणि बॉम्ब आहेत हेदेखील लक्षात घ्यायला हवे. दुसरे असे की, सध्याचे फडणवीस सरकार भिडे गुरुजींसारख्या हिंदुत्ववाद्यांच्या स्वप्नातले सरकार आहे व मोदी यांच्यात भिडे गुरुजींना देवत्वाचा अंश दिसतो. मोदी जेव्हा रायगडावर आले होते त्यावेळी भिडे गुरुजींनी त्यांना आशीर्वाद दिले होते. त्यामुळे स्वतः तलवारी घेऊन सुवर्णसिंहासनाचे रक्षण करणे हा फडणवीस सरकारवरचा अविश्वास ठरेल असे उद्या कुणाला वाटू शकते. मोदी-फडणवीस यांचे सरकार कुचकामी ठरल्याने हिंदू तरुणांना हाती तलवारी घ्याव्या लागल्या हा बोभाटा सरकारला महाग पडू शकतो. सरकार हिंदुत्ववाद्यांचे व हिंदुत्वाच्या रक्षणासाठी आम्हाला तलवारी घ्याव्या लागतात असे होऊ नये. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी राजांनाही हे पटले नसते. कसाब आणि त्याची पाकिस्तानी टोळी मुंबईवर चाल करून आली ती हातात तलवार घेऊन नाही. एके-४७ आणि बॉम्बचा मारा करीत हे नराधम मुंबईत घुसले होते. या सगळय़ाचा विचार करूनच भिडे गुरुजींना त्यांची तलवारबंद फौज उभी करावी लागेल. आम्ही सदैव त्यांच्यासोबत आहोतच.