मुंबई - महाराष्ट्राच्या विधानसभेवर भगवा फडकवण्याचं शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न आज त्यांचे चिरंजीव उद्धव ठाकरे यांनी पूर्ण करून दाखवलंच; पण राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची धुराही स्वतःच्या खांद्यावर घेत त्यांनी शिवसेनेच्या सोनेरी इतिहासात नवा अध्याय रचला आहे. ज्या शिवाजी पार्क मैदानात बाळासाहेबांनी शिवसेनेचं रोप रुजवलं आणि वाढवलं, त्याच शिवाजी पार्क मैदानावर उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र राज्याचे २९ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. मात्र, उद्धव ठाकरेंचा शपथविधी होताच, ट्विटरवर Sorry Balasaheb ट्रेंड सुरू झालाय.
'छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आणि माझ्या आई-वडिलांचे स्मरण करून मी उद्धव बाळासाहेब ठाकरे ईश्वरसाक्ष शपथ घेतो की, कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन. मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडेन...' असे उद्गार संध्याकाळी ६.४०च्या मुहूर्तावर शिवाजी पार्कवरच्या भव्यदिव्य रंगमंचावरून घुमले आणि तमाम शिवसैनिक शहारले, थरारले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उद्धव ठाकरे यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. त्याआधी त्यांनी शिवाजी पार्कातीलच बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर जाऊन आपल्या वडिलांना वंदन केलं.
बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी, उद्धव ठाकरेंनी काँग्रेससोबत हातमिळवणी केली. भाजपाला डावलून शिवसेनेनं काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. त्यामुळे भाजपा समर्थकांना शिवसेनेचं हे रूप आणि उद्धव ठाकरेंचा हा निर्णय रुचला नाही. त्यामुळे, अनेकांकडून शिवसेनेवर टीका होत आहे. उद्धव ठाकरेंनी 6.40 मिनिटांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच, ट्विटरवर #Sorry Balasaheb हा ट्रेंड सुरू झाला आहे. नाराज नेटीझन्कडून हा ट्रेंड करत, शिवसेनेला टार्गेट करण्यात येत आहे.