'उद्धव ठाकरे मातोश्रीवर दररोज शपथ घेतात', 'आम्ही 162'वरुन राणेंचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2019 10:47 PM2019-11-25T22:47:16+5:302019-11-25T22:48:23+5:30
राज्यातील सत्तासंघर्षामध्ये शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीचे आमदारांनी ग्रँड हयात हॉटेलमध्ये एकत्र येत शपथ घेतली.
मुंबई - राज्यातील सत्तास्थापनेच्या संघर्षात महाविकासआघाडीच्या आमदारांना एकत्र करत पक्षाची निष्ठा बाळगेन अशी शपथ देण्यात आली. मात्र, या ओळख परेड कार्यक्रमावर भाजपा नेते आशिष शेलार यांनी जोरदार टीका केली आहे. ओळख परेड आरोपींची केली जाते आणि आपल्याच आमदारांना आरोपी समजणं हा आमदारांचा, लोकशाहीचा अन् मतदारांचा अपमान आहे असे त्यांनी म्हटले. त्यानंतर, भाजपा नेते खासदार नारायण राणेंनीही आम्ही 162 या शपथविधी सोहळ्याची खिल्ली उडवत शिवसेनेवर टीका केली.
राज्यातील सत्तासंघर्षामध्ये शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीचे आमदारांनी ग्रँड हयात हॉटेलमध्ये एकत्र येत शपथ घेतली. संविधानाला साक्ष घेऊन आमदारांनी पक्षाविरोधात कोणतंही कृत्य करणार नाही अशी शपथ घेतली. यावेळी तिन्ही पक्ष आणि मित्रपक्षाचे मिळून 162 आमदार उपस्थित होते, असे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय. पण, ग्रँड हयात हॉटेलमध्ये फक्त 130 आमदार होते असा दावा आता भाजपा नेते नारायण राणे यांनी केला. त्यांच्या हातात आमदारच नाहीत, असाही आरोप नारायण राणेंनी केला. ग्रँड हयात या हॉटेलमध्ये 162 आमदार नव्हते तर 130 आमदारच उपस्थित होते, असा दावा केलाय. जे आमदार आले नाहीत त्यातला सगळ्यात मोठा खड्डा शिवसेनेला पडला आहे. तर, या शपथविधीला काहीच अर्थ नाही, उद्धव ठाकरे रोजच घरात शपथ घेतात, मातोश्रीवर दररोज त्यांचा शपथविधी पार पडतो, असे म्हणत शिवसेना आणि उद्धव ठाकरेंवर नारायण राणेंनी जबरी टीका केली.
दरम्यान, आशिष शेलार म्हणाले की, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आलेलं सरकार आपलं संख्याबळ सिद्ध करेल आणि पाच वर्ष टिकेल, ओळख परेडनं आमदारांचा आत्मविश्वास पुन्हा आणण्याचा हा प्रयत्न आहे, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी आत्मविश्वास गमावला आहे, उपस्थित आमदारांची संख्या 145 तरी होते का असा सवाल त्यांनी उपस्थित केला.