काश्मीरमधील सरकार नालायक आहे, हे कळायला सहाशे जवानांचे बळी का जावे लागले- उद्धव ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2018 07:52 PM2018-06-19T19:52:59+5:302018-06-19T20:00:24+5:30
पाकिस्तान दिवाळी, गणपतीला कधी शस्त्रसंधी करते का?
मुंबई: तीन वर्षांनंतर भाजपाला जम्मू-काश्मीरमधील सरकार नालायक असल्याची उपरती झाली का, असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. ते मंगळवारी मुंबईतील शिवसेनेच्या वर्धापनदिन मेळाव्यात बोलत होते. काश्मीरमध्ये पीडीपीशी असलेली युती तोडून सरकारमधून बाहेर पडण्याच्या भाजपाच्या निर्णयावर यावेळी त्यांनी सडकून टीका केली. त्यांनी म्हटले की, भाजपा आणि पीडीपीची युती अभद्र अशीच होती. त्यामुळे ही युती तोडली ही चांगली गोष्ट झाली. मात्र, जम्मू काश्मीरचं सरकार नालायक आहे हे कळायला तीन वर्ष आणि ६०० सैनिकांचे बळी का जावे लागतात, असा सवाल उद्धव यांनी विचारला. तसेच केंद्र सरकारने रमजानच्या महिन्यात काश्मीरमध्ये शस्त्रसंधी का केली? पाकिस्तान दिवाळी, गणपतीला कधी शस्त्रसंधी करते का?, असा सवाल विचारून उद्धव यांनी भाजपाची कोंडी करण्याचा प्रयत्न केला.
उद्धव ठाकरे म्हणाले,
>> गेलेली सत्ता खेचून आणू पण हिंदुत्व सोडणार नाही. अशी तडजोड मी केली तर शिवराय आणि शिवसेनाप्रमुख मला माफ करणार नाहीत.
>> देव-देश-धर्म संभाजी महाराजांनी कधी सोडले नाही.
>> फक्त गायीला वाचवणं हा हिंदू धर्म नाही तर औरंगजेब सारख्या शहीद सैनिकाला मुजरा करणं हे हिंदुत्व.
>> ज्यांनी ज्यांनी शिवसेनाप्रमुखांविरोधात राजकारण केलं त्यांना राजकारणात आडवं कसं करायचं ते मी दाखवून देतो.
>> आपली ताकद वाढली आहे, म्हणून विविध लोक आपल्याला बोलवत आहेत.
>> भगवा फडकवण्याचा निर्धार केला आहे. ज्यांना त्याच्या आड यायचं आहे त्यांना सांगतो मी त्यांच्या छाताडावर बसून शिवसेनेचा मुख्यमंत्री बसवेन.
>> मोदींनी थापा मारून सरकार आणलं.
>> महाराष्ट्रात शिवसेना क्रमांक एकचा पक्ष करणारच. जनतेच्या मनामध्ये भगवा रुजवा, आपोआप भगवा महाराष्ट्रावर फडकेल.