Join us

राजकारणासाठी स्वत:ची डोकी वापरा, दैवतांच्या पगड्या नको; उद्धव ठाकरेंचा पवारांना टोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 5:05 PM

तुम्हाला लोकमान्यांची पगडी नको, पण इफ्तारची 'टोपी' कशी चालते?

मुंबई: राजकारणासाठी स्वत:ची डोकी वापरा, दैवतांच्या पगड्या नको, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वेसर्वा शरद पवार यांना लगावला. ते मंगळवारी शिवसेनेच्या वर्धापनदिन मेळाव्यात बोलत होते. काही दिवसांपूर्वी पुण्यात झालेल्या कार्यक्रमात शरद पवार यांनी यापुढे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमांमध्ये पुणेरी नव्हे तर फुले पगडीचा वापर करा, असे सांगितले होते. यावरून विरोधकांनी शरद पवार यांच्यावर जातीय राजकारणाचा आरोप केला होता. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली. टिळक किंवा फुले हे पगड्यांमुळे मोठे झाले नाहीत. तर त्यांच्यामुळे या पगड्या मोठ्या झाल्या. केवळ डोक्यावर पगडी घालून लोकमान्य टिळक किंवा महात्मा फुलेंसारख्या लोकांचे विचार डोक्यात शिरणार नाहीत. तुम्हाला लोकमान्यांची पगडी नको, पण इफ्तारची 'टोपी' कशी चालते?, असा सवालही उद्धव यांनी विचारला. तसेच राजकारणासाठी स्वत:ची डोकी वापरा, दैवतांच्या पगड्या नको, असे आवाहन करत त्यांनी शरद पवारांना टोला लगावला. 

शिवसेनेची ताकद वाढल्यामुळेच पवारांनी आपल्याला ऑफर दिलीशरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी भाजपाविरोधात समविचारी पक्षांनी एकत्र यावे, असे सांगत शिवसेनेसमोर तिसऱ्या आघाडीत सामील होण्याचा प्रस्ताव ठेवला होता. परंतु, शिवसेनेला आत्ताच अशा ऑफर का येत आहेत, याचा विचार करा. हे आपली ताकद वाढल्याचं लक्षण असल्याचे उद्धव यांनी सांगितले. तसेच समविचारी पक्ष म्हणजे म्हणजे सत्तेची आस असलेले राजकीय पक्ष असा अर्थ अभिप्रेत आहे का, असा सवालही त्यांनी विचारला. मात्र, तिसऱ्या आघाडीत सामील होणार की नाही, याबाबत उद्धव यांनी कोणतेही भाष्य केले नाही.

टॅग्स :उद्धव ठाकरेशिवसेनाशरद पवार