मुंबई-
देशात आता न्याय आणि सत्याच्या बाजूनं निकाल दिला जात नाही. त्यामुळे जनतेच्या कोर्टात जाणून सत्याची बाजू मांडावी लागणार आहे आणि यासाठी देशातील सर्वच विरोधी पक्षांनी एकत्र येणं गरजेचं आहे, असं विधान खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. तसंच गेल्या दोन दिवसांपासून उद्धव ठाकरे देशातील प्रमुख विरोधी पक्षांच्या नेत्यांशी फोनवरुन संवाद साधत आहेत, असंही संजय राऊत यांनी सांगितलं. ते मुंबईत प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते.
लोकसभा निवडणुकीला आता ४०० दिवस उरले आहेत. यादृष्टीनं भाजपाला आव्हान देण्यासाठी विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे. यासाठीचे काही प्रयत्न सुरू आहेत का? असं विचारलं असता संजय राऊत यांनी विरोधी पक्षांच्या एकजुटीसाठी महत्वाचं विधान केलं. "देशातील प्रमुख विरोधी पक्षांनी आता एकत्र येणं गरजेचं तर आहेच. पण यासाठी उद्धव ठाकरे देखील पुढाकार घेत आहेत. सध्या सुरू असलेल्या घडामोडींबाबत त्यांचं गेल्या दोन दिवसांपासून देशातील प्रमुख विरोधी पक्षाच्या नेत्यांशी फोनवरुन बोलणं सुरू आहे", अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.
आमची लढाई भाजपासोबत, शिंदे गट गुलाम"शिंदे गट भाजपाचे गुलाम आहेत. आमची खरी लढाई भाजपासोबतच आहे. शिवसेनेला संपवण्यासाठी हे सारं केलं जात आहे. या व्यापारी मंडळींना महाराष्ट्र ताब्यात घ्यायचाय आणि त्यासाठी शिवसेना सर्वात मोठा अडथळा ठरतोय. यामुळेच पक्षाचं नाव आणि चिन्ह आपल्या ताब्यात यावं यासाठी २ हजार कोटींचा सौदा झाला आहे", असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.