Join us

उद्धव ठाकरेंची 'मार्मिक' टोलेबाजी; मोदी-शाहांसह एकनाथ शिंदेंना शाब्दिक फटकारे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2024 9:19 PM

मार्मिकच्या वर्धापनदिनी मराठी माणसाला मुंबईत पुन्हा संघर्षाचे दिवस येणार असतील आम्हाला पूर्वीचीच भाषा वापरावी लागेल का असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला आहे. 

मुंबई - आज आपलीच मुंबई आपल्याला उपरी होणार असेल तर हे २ महाराष्ट्रद्वेष्टे दिल्लीत बसलेत. मी त्यांना काही नावे दिलीत, मी व्यंगचित्र काढत नसलो तरी शब्दाने थोडंसं बोलतो ते लोकांना पटते. अशावेळी ही मशालीची धग त्यांच्या बुडाला लावायची की नाही? असं म्हणत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोदी-शाहांना फटकारलं आहे.

मुंबईत मार्मिक साप्ताहिकाच्या ६४ व्या वर्धापनदिन सोहळ्याचं आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना शाब्दिक फटकारे लगावले. ठाकरे म्हणाले की, संयुक्त महाराष्ट्रात आपण मुंबई मिळवली परंतु मुंबईत मराठी माणसांचं स्थान काय, सगळं हद्दपार व्हायला लागलं. मराठी माणूस मुंबई सोडून जायला लागला. नोकरी मिळत नव्हती. शिवसेनेच्या ताकदीमुळे मुंबईत मराठी माणूस टिकला. वाचा आणि थंड बसा अशा याद्या समोर येऊ लागल्या. माझ्या आजोबांनी शिवसेना नाव दिलं अन् बाळासाहेबांनी संघटनेची स्थापना केली. हे सगळं का सांगतोय, जास्तीत जास्त वर्गणीदार वाढवा असं इथं सांगितले गेले. परंतु आताचा जमाना असा आहे वर्गणीदार जास्त म्हणून मार्मिक आमचा असा दावा कुणीतरी करण्याचा प्रयत्न करेल असं सांगत उद्धव ठाकरेंनी नाव न घेता एकनाथ शिंदेंना टार्गेट केले.  

हल्ली डेस्टिनेशन मॅरेज कल्पना आली आहे. एखादं हॉटेल बुक करतात, १०० टक्के खोल्या बुक करतात. हॉल बुक करतात मग कुणी दावा केला या हॉटेलचा मालक मी अशी सगळी लाचारी सुरू झाली आहे. या सर्व गोष्टीकडे बघितल्या नंतर त्याकाळी माझे आजोबा संयुक्त महाराष्ट्राची चळवळ लढलेले होते. स्वत: शिवसेनाप्रमुख, माझे काका, आचार्य अत्रे समोर अन्याय सुरू असताना स्वस्थ कुणी बसू शकेल का? मग सगळे एकत्र झाले शिवसेनेची स्थापना झाली. त्यानंतर वाचा आणि थंड बसा जे शीर्षक होते ते वाचा आणि उठा असं झालं. हे सगळं माहिती आहे परत का सांगताय असं तुम्ही म्हणत असाल. पण आता तीच वेळ आलेली आहे असं उद्धव ठाकरेंनी सांगितले. 

दरम्यान, मराठी माणसांना प्रवेश नाही, मग कंपनी असेल, इमारती असेल अशा बातम्या येऊ लागल्यात. त्यामुळे आम्हाला तीच भाषा वापरावी लागेल का? एअर इंडियात मराठी माणूस कसा शिरला, त्याच्या एमडी नंदाच्या गालावर खाडकन् आवाज आला. कानाखाली आवाज काढल्यावर एअर इंडियाचे दरवाजे मराठी माणसासाठी उघडले. मुंबईत पुन्हा मराठी माणसाला संघर्ष करून मिळवलेल्या राजधानीत असे दिवस येणार असतील तर तेव्हा जसा कुंचल्याचा पलिता झाला होता तशीच आज कुंचल्याची मशाल झालेली आहे. ही मशाल उगाच घेतली नाही. काळ बदलला. परिस्थिती बदलली असं वाटलं परंतु आपलाच वापर करून हे मुंबईद्वेष्टे, महाराष्ट्रद्वेष्टे आपल्या खांद्यावर चढून दिल्लीत बसले. आज आपल्याला लाथा घालण्याची भाषा करत असतील तर त्यांचे तंगडे बाजूला फेकायचं की नाही फेकायचं? असा इशाराही उद्धव ठाकरेंनी भाजपाचं नाव न घेता दिला. 

मार्मिक, सामना तो खणखणीत आवाज 

मार्मिकच्या पानात आपल्या आयुष्याचं मार्गदर्शन असते. आपण कसं जगायला पाहिजे, न्याय हक्क म्हणजे काय हे कळतो. गोदी मीडिया असला तरी काय त्यात एक आवाज खणखणीत निघायला हवा. तो आवाज म्हणजे मार्मिक आहे. सामना आहे असंही उद्धव ठाकरे यांनी यावेळी म्हटलं. 

टॅग्स :उद्धव ठाकरेएकनाथ शिंदेभाजपाअमित शाहनरेंद्र मोदीशिवसेना