Join us

जेव्हा उद्धव ठाकरे म्हणतात, "दादा तुम्हाला माईक खेचायला कुठून बरं पडेल"

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2022 9:53 PM

उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षरित्या मुख्यमंत्री आणि उमुख्यमंत्र्यांना टोला लगावला.

सोमवारी आगामी हिवाळी अधिवेशनात शिंदे-फडणवीस सरकारला घेरण्यासाठी महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंततर महाविकास आघाडीने पत्रकार परिषद घेतली. यावेळी महाविकास आघाडीचा महामोर्चा १७ डिसेंबर रोजी मुंबईत काढण्याची घोषणा यावेळी उद्धव ठाकरे यांनी केली. दरम्यान, पत्रकारांशी संवाद साधण्यापूर्वी उद्धव ठाकरे आणि अजित पवार त्या ठिकाणी एकत्र आले. त्यावेळी बसताना उद्धव ठाकरे यांनी अजित पवारांना खुर्चीवर बसताना “दादा तुम्हाला माईक खेचायला कुठून बरं पडेल” असा मिश्किल सवाल करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अप्रत्यक्ष टोला लगावला.

महाविकास आघाडीकडून १७ डिसेंबर रोजी महामोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली. तसेच शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधताना, सरकारने आधी जमत नाही म्हणून जाहीर करावे. मग सरकार चालवण्यापासून ते बेळगावला जाईपर्यंतची सगळी जबाबदारी मी घेतो, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे. 

"सरकारने जमत नाही म्हणून जाहीर करावे"यावेळी पत्रकारांनी महाविकास आघाडी सरकारच्या वतीने काही नेते बेळगावात जाणार का, याबाबत उद्धव ठाकरेंना विचारले. यावर, यापूर्वी छगन भुजबळ, संजय राऊत यांच्यासह अनेक नेते बेळगावात जाऊन आले आहेत. तसेच सरकारने जमत नाही म्हणून जाहीर करावे. मग आम्हाला काय करायचे आहे, ते आम्ही करतो. सरकार चालवण्यापासून ते अगदी बेळगावला जाईपर्यंतची सगळी जबाबदारी मी घेतो, असे उद्धव ठाकरेंनी सांगितले. 

दरम्यान, राज्यात अस्तित्वात आलेल्या बेकायदेशीर सरकारमुळे राज्याची अस्मिता धुळीस मिसळत आहे. राज्यपालांच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या प्रतिमेला तडे जात आहेत. तसेच कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या गावांवर दावा केला आहे. पुढच्या वर्षी कर्नाटकची निवडणूक असल्याने महाराष्ट्रातील गाव तोडणार का?  या सगळ्यावरून राज्यात मुख्यमंत्री आहेत का असा प्रश्न पडतोय, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. 

टॅग्स :उद्धव ठाकरेअजित पवार