Uddhav Thackeray: पक्ष टिकवण्याचं आव्हान, कसा राखणार धनुष्यबाण? उद्धव ठाकरे दुपारी २ वाजता सांगणार, संपूर्ण राज्याचं लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2022 01:00 PM2022-07-08T13:00:35+5:302022-07-08T13:00:48+5:30
Uddhav Thackeray: आज दुपारी २ वाजता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मातोश्री निवासस्थानावरून प्रसारमाध्यमांशी संवात साधणार आहेत. यावेळी ते काय बोलतात याकडे राजकीय वर्तुळासह राज्यभरातील शिवसैनिकांचं लक्ष लागलं आहे.
मुंबई - एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली आमदारांनी केलेली बंडाळी, स्वपक्षीयांच्या बंडखोरीमुळे गमवावं लागलेलं मुख्यमंत्रिपद आणि आता पक्षात उभी फूट पडून चिन्ह गमावण्याची निर्माण झालेली भीती या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आघाडीवर येत मोर्चा सांभाळायला सुरुवात केली आहे. आमदारांच्या बंडखोरीनंतर पक्षातील विविध पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेत उद्धव ठाकरे यांनी पक्षातील फूट टाळण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. दरम्यान, आज दुपारी २ वाजता उद्धव ठाकरे मातोश्री निवासस्थानावरून प्रसारमाध्यमांशी संवात साधणार आहेत. यावेळी ते काय बोलतात याकडे राजकीय वर्तुळासह राज्यभरातील शिवसैनिकांचं लक्ष लागलं आहे.
एकनाथ शिंदे गटाने आपला गट हीच खरी शिवसेना असल्याचा दावा केला आहे. शिंदे गटाला आमदारांनंतर अनेक खासदारांचा पाठिंबाही मिळण्याची शक्यता आहे. आता शिंदे गट शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावरही दावा करण्याची शक्यता आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि शिंदे गटामध्ये कायदेशीर लढाई होण्याची चिन्हे आहेत. त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी कायदेशीर लढाईमध्ये धनुष्यबाण हे चिन्ह गमवावे लागल्यास नव्या चिन्हासाठी तयार राहा आणि ते घरोघरी पोहोचवा, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केल्याचं वृत्त आलं होतं. त्यावर आता उद्धव ठाकरे याय भाष्य करणार याबाबत सर्वसामान्यांमध्ये उत्सुकता आहे.
तसेच आमदारांचा एक मोठा गट फुटून बाहेर पडल्यानंतर विविध शहरातील माजी नगरसेवक पदाधिकारीही शिंदे गटाला देत असलेला पाठिंबा, तसेच खासदारांकडूनही येत असलेला दबाव याबाबत पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे काय बोलतात याबाबतही उत्सुकता आहे.