मुंबई - विधानसभा २०१९ च्या निवडणुकीत कोल्हापूर उत्तर मतदारसंघात भाजपने काँग्रेसला छुपी मदत केली. तशी छुपी युती आम्ही करीत नाही. शिवसेना समोरून वार करते, पाठीत वार करणारी आमची औलाद नाही. हिंदुत्वाचे पेटंट भाजपनेच घेतले आहे का, अशी रोखठोक विचारणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी केली. तसेच, कोल्हापूरचा सुपुत्र आणि महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटीलचं अभिनंदन करत, भाजपवर निशाणा साधला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पृथ्वीराज पाटीलच्या कामगिरीचं कौतूक केलं. मला स्वत:ला अभिमान आहे की, पृथ्वीराजच्या रुपाने 21 वर्षांनंतर पुन्हा महाराष्ट्र केसरीचा मुकूट मिळाला, मानाची गदा मिळाली. पृथ्वीराजचं मी मनपूर्वक अभिनंदन करतोच, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपला चिमटा काढला. राजकीय पक्षाच्या कुस्त्या सुरू झाल्या तर समोरासमोर मर्दासारखं लढणारं कुणी नाही. कुस्तीमध्ये भाजप उतरला तर पैलवानाची कुस्ती खेळण्याअगोदर, आदल्यादिवशी त्याच्यावर धाडी टाकतील, ईडीची धाड, सीबीआयची धाड, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.
भाजपने नकली भगव्याचा बुरखा पांघरला असून, तो या निवडणुकीत फाटल्याशिवाय राहणार नाही, असेही ठाकरे यांनी बजावले. आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांच्या प्रचारार्थ ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संबोधित केले. ते म्हणाले, आम्ही काँग्रेससोबत गेलो म्हणजे हिंदुत्व सोडलेले नाही. तुम्ही काश्मीरमध्ये मेहबुबा मुफ्तींसोबत सरकारमध्ये गेला. तेव्हा हिंदुत्व कोठे गेले होते? भाजपने बनावट हिंदुहृदयसम्राट बनवण्याचा प्रयत्न केला; मात्र जनतेने तो झिडकारला.
हनुमान चालिसा म्हटल्यास राग का येतो?
ज्यांना हिंदू समाजाच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या भगव्या झेंड्याची ॲलर्जी आहे, त्यांना पाठबळ देणे हे कसले हिंदुत्व, अशी विचारणा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापुरात केली. तुम्हाला जर मशिदीवरील भोंगे चालत असतील, तर मग हनुमान चालिसा म्हटले तर राग का येतो, असा सवालही त्यांनी केला. कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने शनिवारी जाहीर सभा घेत रविवारी पत्रकारांशी संवाद साधताना फडणवीस म्हणाले, भगव्याचे रक्षणासाठी आम्ही मैदानात उतरलो आहोत. ज्यांनी राम मंदिराला विरोध केला, त्यांच्याविरोधात ही लढाई आहे. ३७० कलम रद्द केल्यानंतर रक्ताचे पाट वाहतील, असा इशारा दिल्यानंतरही मोदी नावाच्या वाघाने कलम रद्द केले; पण कुणाच्या बापाची विरोध करण्याची हिंमत झाली नाही. रक्ताचे पाट राहू दे, आता काश्मीरमध्ये तिरंगा लहरतोय. हे आहे हिंदुत्व.