Join us

तेलशुद्धीकरण प्रकल्पासाठी पेट्रोलियम मंत्री थेट उद्धव ठाकरेंच्या भेटीला; शिवसेनेचा विरोध मावळणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2019 1:55 AM

स्थानिकांचा विरोध आणि त्यानंतरच्या राजकारणामुळे तब्बल तीन लाख कोटींचा हा प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

मुंबई : स्थानिकांच्या विरोधानंतर सुरू झालेल्या राजकारणामुळे नाणार येथील प्रस्तावित तेलशुद्धीकरण प्रकल्प रायगड जिल्ह्यात हलविण्याची तयारी सुरू आहे. नाणारप्रमाणे रायगडमध्ये विरोधाचा सामना करावा लागू नये, यासाठी भाजपकडून विशेष काळजी घेतली जात आहे. रविवारी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी मातोश्री येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेत प्रकल्पाबाबत चर्चा केली.स्थानिकांचा विरोध आणि त्यानंतरच्या राजकारणामुळे तब्बल तीन लाख कोटींचा हा प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. सौदी अरेबियाची अरमाको, इंडियन आॅइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम यांच्या सहभागातून उभारला जाणारा हा प्रस्तावित प्रकल्प जगातील सर्वात मोठा तेलशुद्धीकरण प्रकल्प आहे. नाणार येथून रायगड जिल्ह्यात प्रकल्प हलविण्याच्या हालचाली सुरू असताना पेट्रोलियम मंत्री प्रधान यांनी उद्धव ठाकरे यांची भेट चर्चा केली. या वेळी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई उपस्थित होते. स्थानिकांची बाजू घेत शिवसेनेने प्रकल्पाच्या विरोधात भूमिका घेतली. त्यामुळे सर्व तयारी झालेली असतानाही नाणारऐवजी रायगडची चाचपणी सुरू आहे. प्रधान यांनी आजच्या भेटीत प्रकल्पासाठी शिष्टाई केली असली तरी उद्धव ठाकरे यांनी मात्र आपली भूमिका स्पष्ट केली नसल्याचे समजते. नाणार येथील प्रकल्पास शिवसेनेचा स्पष्ट विरोध आहे. रायगडबाबत शिवसेनेने अद्याप आपली भूमिका स्पष्ट केली नाही. प्रधान यांच्या चर्चेतही उद्धव यांनी ऐकून घेण्याचीच भूमिका घेतल्याचे समजते.रायगडच्या जागेबाबत संभ्रमनाणार येथील प्रकल्प रायगड जिल्ह्यात हलविण्यात येणार आहे. त्यासाठी अलिबाग, मुरूड, रोहा, श्रीवर्धन येथील ४० गावांतील जमीन संपादन करण्यासाठी या गावांच्या ग्रामस्थांनी सहमती दर्शविल्याची माहिती स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत विधानसभेतील लेखी प्रश्नाच्या उत्तरात दिली. तर विधान परिषदेतील लेखी प्रश्नाच्या उत्तरात शिवसेना नेते आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मात्र रायगड जिल्ह्यात तेलशुद्धीकरण प्रकल्पासाठी भूसंपादन करण्याचा प्रस्ताव उद्योग विभागाच्या विचाराधीन नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे तेलशुद्धीकरण प्रकल्पाबाबत शिवसेनेची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही.

टॅग्स :उद्धव ठाकरे