मुंबई : शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदार संघ असलेल्या वाराणसीच्या दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती मिळत आहे. अयोध्या दौऱ्यानंतर आता उद्धव ठाकरे वाराणसीतील काशीमध्ये सभा घेणार असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे असे समजते की, अयोध्येतील राम मंदिरसाठी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मतदार संघात शिवसेना शक्तीप्रदर्शन करण्याच्या तयारीत आहे.
अयोध्येतील राम मंदिराच्या मुद्यावरुन शिवसेनेने आक्रमक भूमिका स्वीकारली आहे. राम मंदिर निर्माणाच्या मागणीसाठी उद्धव ठाकरे यांनी काही हिंदुत्ववादी संघटनांसह गेल्या 25 नोव्हेंबर रोजी अयोध्येत सभा घेतली होती. यावेळी उद्धव ठाकरे यांनी राम मंदिराच्या मुद्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला अप्रत्यक्षपणे लक्ष्य केले होते.
'हिंदूंनी आणखी किती काळ राम मंदिराची वाट पाहायची. आता हिंदू मार खाणार नाही, असे अटलबिहारी वाजपेयी म्हणाले होते. त्याचप्रमाणे आता हिंदू स्वस्थ बसणार नाही. मंदिर कधी उभारणार, हा प्रश्न तो विचारणारच,' अशा शब्दांमध्ये उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला ठणकावले होते. तसेच, झोपलेल्या कुंभकर्णाला जागे करण्यासाठी मी या ठिकाणी आलो आहे, असेही त्यांनी अयोध्येतील सभेत म्हटले होते.
(Ayodhya Ram Mandir: बोला, कधी उभारताय राम मंदिर; मला आज तारीख हवीय: उद्धव ठाकरे)