"धारावी उद्ध्वस्त करायचा डाव यशस्वी होऊ देणार नाही, अदानींना झेपत नसेल तर..."
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2024 03:42 PM2024-07-20T15:42:31+5:302024-07-20T15:44:27+5:30
धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंचा घणाघात
Uddhav Thackeray on Dharavi Redevelopment Project: "विधानसभा निवडणुका जवळ यायला लागल्या आहेत. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून फसव्या घोषणा केल्या जात आहेत. मी आज 'लाडका मित्र' किंवा 'लाडका कॉन्ट्रॅक्टर' योजनेबद्दल बोलतो आहे. धारावीवासीयांचे पुनर्वसन कसे होणार आहे? अनेकांचे उद्योग-धंदे आहेत, ती लोक कुठे जाणार? याबाबत माहिती दिली पाहिजे. धारावीवासीयांना तिथल्या तिथे ५०० फुटाचे घर मिळालेच पाहिजे, त्यांच्या उद्योगधंद्याची सोय झाली पाहिजे, ही आमची आग्रही मागणी आहे. फक्त धारावीच नव्हे तर मुंबईतील ज्या-ज्या ठिकाणी पुनर्वसनाचे काम होणार आहे, त्याठिकाणी आम्ही मुंबईकराच्या पाठिशी आहोत. मुंबई अदानींच्या घशात टाकण्याचा डाव, धारावी उद्ध्वस्त करण्याचा डाव आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. अदानींना झेपत नसेल तर हे टेंडर रद्द करा," अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी राज्यातील महायुती सरकारला तोफ डागली.
"अनेक प्रकारे कॉन्ट्रॅक्टरला मालामाल करायचा प्रयत्न सुरु आहे. त्यातच मोदी, शाहा यांना सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी गुजरातला घेऊन जायच्या आहेत आणि मुंबईला 'अदानी सिटी' करायची आहे. पण तसे घडू न देण्यासाठी आता एक मुंबईरक्षक समिती असली पाहिजे. अदानींना जे टेंडर दिले जात आहे, त्यात जे उल्लेख केले आहे, त्यापेक्षा जास्त दिले जात येत आहे. खरे पाहता धारावीचा भूखंड हा ५९० एकरचा असून त्यातील ३०० एकरचा भाग हा गृहनिर्माणासाठी आहे. बाकीच्या भुभागावर उद्याने आणि विविध गोष्टी आहेत. वाढीव टीडीआर कुठेच नाही आहे पण हे सरकार ते करत आहे," असा आरोप त्यांनी केला.
"धारावीतील रहिवाशांना नंबर दिले जात असून पात्र-अपात्र ठरवले जात आहेत. धारावीतील लोकांना बाजूला सारुन कुर्ला मदर डेरी, मुंबई मिठागार, टोलनाक्याची जागा, अशा काही जागा अधिग्रहित करत आहेत. झोपडपट्टी पुनर्वसनाच्या नावाखाली बाकीचे क्षेत्र लाटले जात आहे. १८९ पानांचे टेंडर अदानींसाठी केले आहे. सरकारने मित्रासाठी केलेला हा खटाटोप आहे. पण या टेंडरमध्ये धारावीवासीयांच्या पोटापाण्यासाठी काहीच नाही आहे. या टेंडरबद्दल जर कुणी न्यायालयात गेले तर टेंडर रद्द होईल. पण हे जर असंच चालू राहिलं तर टीडीआरची बँक अदानी बनणार आहेत. त्यामुळे अदानींसाठी लाडका कॉन्टॅक्टर योजनेतून हे टेंडर काढलं आहे का?" असे खोचक टोला त्यांनी लगावला.