यदु जोशी
मुंबई - राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगला सोडण्यापूर्वी फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधला होता. त्यावेळी, मी मुख्यमंत्रीपद सोडत असून आमदारकीचाही राजीनामा देत असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. मात्र, अद्यापही उद्धव ठाकरेंनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला नाही. त्यांनी केवळ मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषद आमदारकीचा राजीनामा न दिल्याने विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेतेपद हे शिवसेनेकडे जाण्याची आशा अद्यापही कायम आहे.
उद्धव ठाकरे यांनी अद्याप आमदारकीचा राजीनामा दिला नाही. त्यामुळे, ते आमच्यादृष्टीने आमदार म्हणून कायम आहेत, असे विधिमंडळातील अधिकृत सुत्रांनी स्पष्ट केले. तर, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेतेपद शिवसेनेकडेच राहावे, या हेतूनेच अद्यापही त्यांनी राजीनामा दिला नसल्याचे समजते. विशेष म्हणजे विधानपरिषद आमदारांचा राजीनामा सभापतींकडे दिला जातो. मात्र, सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचा कार्यकाळ 7 जुलै रोजीच संपुष्टात आला आहे. सध्या, उपसभापतीपदी शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे या आहेत.
विधानपरिषदेत शिवसेनेचे 12 सदस्य असून काँग्रेस-राष्ट्रवादीचे प्रत्येकी 10 सदस्य आहेत. विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादीला देण्यात आलं आहे. त्यामुळे, विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर शिवसेना आणि काँग्रेसकडून दावा करण्यात येत आहे. यासंदर्भात काँग्रेसने आपली इच्छाही बोलून दाखवली आहे. शिवसेनेचे विधानपरिषदेत 12 सदस्य असून विप्लव बाजोरिया हे शिंदेगटासोबत गेले आहेत. मात्र, तांत्रिकदृष्ट्या ते अद्यापही ठाकरेंसोबतच्या शिवसेनेतच आहेत.
विधानपरिषदेत बंडांसाठी संख्याबळ किती
शिवसेनेकडे एकूण 12 विधानपरिषद सदस्य आहेत. त्यामुळे, जोपर्यंत येथील 8 आमदार बंड करत नाहीत, तोपर्यंत येथे संवैधानिकदृष्ट्या वेगळ्या गटाला मान्यता मिळणार नाही. येथील 12 आमदारांवर नजर टाकली असता सध्यातरी त्यापैकी 8 आमदार शिंदे गटाच्या गळाला लागतील, असे चित्र दिसत नाही.
विधानपरिषदेतील एकूण संख्याबळ
एकूण सदस्य संख्या - 72भाजप - 24शिवसेना - 12काँग्रेस - 10राष्ट्रवादी - 10अपक्ष - 4शेकाप, लोकभारती, रासप - प्रत्येकी 1रिक्त - 15राज्यपाल कोट्यातील 12 जागा रिक्त आहेत.