Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंनी घेतली संजय राऊत यांच्या कुटुंबीयांची भेट, धीर देत म्हणाले, ‘शिवसेना आणि मी…’
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2022 02:47 PM2022-08-01T14:47:50+5:302022-08-01T14:48:48+5:30
Uddhav Thackeray Meet sanjay Raut Family: ईडीने संजय राऊत यांना केलेल्या अटकेच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी संजय राऊत यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या आईंच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच त्यांच्या कुटुंबीयांना धीर दिला.
मुंबई - शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांच्यावर पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ईडीने अटकेची कारवाई केली आहे. काल संजय राऊत यांच्या निवासस्थानी धाड घातल्यानंतर ईडीने त्यांची दिवसभर चौकशी करत त्यांना रात्री ताब्यात घेतले होते. तसेच रात्री त्यांना अटक करण्यात आली. या सर्व घटनाक्रमामुळे संजय राऊत यांच्या कुटुंबाला धक्का बसला असून, ते तणावात आहेत. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी संजय राऊत यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या आईंच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच त्यांच्या कुटुंबीयांना धीर दिला.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी मातोश्रीवरून भांडुप येथे येत संजय राऊत यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. सुमारे दहा मिनिटे उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या कुटुंबीयांशी चर्चा केली. तसेच संजय राऊत यांच्या आईच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी राऊत यांच्या कुटुंबीयांना धीर देत उद्धव ठाकके म्हणाले की, काळजी करू नका, शिवसेना आणि मी तुमच्यासोबत आहे. उद्धव ठाकरे भेटीसाठी आले तेव्हा संजय राऊत यांच्या कन्याही उपस्थित होत्या.
दरम्यान, संजय राऊत यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी आलेल्या उद्धव ठाकरे यांच्याशी प्रसारमाध्यमांनी संवाद साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा उद्धव ठाकरे यांनी ही कौटुंबिक भेट होती, असं सांगितलं. तसेच मी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत या घटनेवर आपलं मत मांडणार आहे, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
मुंबईतील पत्रा चाळ घोटाळ्याप्रकरणी दिवसभर चाललेल्या चौकशीनंतर शिवसेना नेते संजय राऊत यांना ईडीने अटक केली आहे. एक हजार कोटींहून अधिकच्या घोटाळ्या प्रकरणी संजय राऊत यांनी तपासात सहकार्य करत नसल्याचा आरोप आहे. काल दिवसभर राऊत यांची चौकशी केल्यानंतर ईडीने रात्री त्यांच्यावर अटकेची कारवाई केली. त्यानंतर आज दुपारी वैद्यकीय तपासणीसाठी राऊत यांना रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर त्यांना कोर्टाट हजर केले जाईल. तिथे राऊत यांना कोठडी मिळते की जामीन याबाबत कोर्ट निर्णय देईल.