मुंबई: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ३८ हून अधिक आमदारांनी केलेल्या बंडखोरीमुळे शिवसेनेला मोठे भगदाड पडल्याचे पाहायला मिळत आहे. एकीकडे पक्षातील डॅमेज कंट्रोल करण्यासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) अधिक सक्रीय झाले आहेत. यातच शिवसेनेच्या भायखळ शाखेचे पदाधिकारी बबन गावकर आणि विजय कामतेकर यांच्या गाडीवर काही जणांनी हल्ला केला होता. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी प्रत्यक्ष शाखेला भेट दिली. शिवसैनिकांच्या जीवावर येत असेल, तर खपवून घेणार नाही, असा इशारा दिला.
भायखळा शाखा क्रमांक २०८ च्या शिवसैनिकांनी या हल्ल्याबाबत उद्धव ठाकरे यांना प्रत्यक्ष घटनाक्रम सांगितला. तसेच पोलीस स्थानकात तक्रार घेत नसल्याचा दावा केला. याशिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसैनिकांच्या केसालाही धक्का लागू देणार नसल्याचे विधान केले होते, कोणते सैनिक उद्धव ठाकरेंचे की, एकनाथ शिंदेंचे शिवसैनिक, असा प्रश्न उद्धव ठाकरेंना विचारण्यात आला. यानंतर अधिकाऱ्यांना बोलावत, ज्यांनी हल्ला केल्याचा दावा केला आहे, त्यांना संरक्षण दिले जात आहे आणि ज्याच्यावर हल्ला झाला आहे, त्याला संरक्षण का देत नाही, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
शिवसैनिकांच्या जीवावर येत असेल तर खपवून घेणार नाही
पोलिसांनी राजकारणात पडू नका. आमचे काय करायचे ते आम्ही करू, जी लढाई आहे, ती लढू. पण, जीवाशी खेळ होणार असेल, तर शांत राहू शकणार नाही. यापुढे यांच्या केसालाही धक्का लागला तरी, तुम्ही सगळे जबाबदार राहाल. शिवसैनिकांच्या जीवावर येत असेल तर खपवून घेणार नाही. शिवसैनिकांचे रक्त सांडू नये, यासाठी मी स्वतः शांततेचे आवाहन केले आहे. हे राजकारण नाही, हे सर्व सूडातून केले जात आहे. या हल्ल्यामागे कोण आहे, याचा तपास केला का नाही. पोलिसांना जमत नसेल, तर तुम्ही हात वर करा, मग शिवसैनिक बघतील, संरक्षण कसे करायचे ते, असे उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.