उद्धव ठाकरे करणार पूरग्रस्त भागाचा दौरा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2019 05:07 AM2019-08-16T05:07:04+5:302019-08-16T05:07:31+5:30
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे २१ आणि २२ आॅगस्टला पूरग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत.
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे २१ आणि २२ आॅगस्टला पूरग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत. पूरग्रस्त भागात मदतकार्य हाती घेण्याचे आवाहन केल्यानंतर मुंबईसह राज्यातील विविध ठिकाणांहून शिवसेना आमदार, पदाधिकारी यापूर्वीच पूरग्रस्त भागांत दाखल झाले आहेत. कोल्हापूर, सांगली भागातील पुराचे पाणी आता ओसरू लागले आहे. त्यामुळे शिवसेना नेत्यांसह उद्धव ठाकरे या भागाचा दौरा करणार आहेत. ठाकरे यांच्यासोबत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे तसेच शिवसेना नेते, कोल्हापुरातील आमदार, खासदार, पदाधिकारी या वेळी उपस्थित असणार आहेत. सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी मदतकार्यात उतरण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे नेते कामाला लागले होते. काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा करणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार उद्धव ठाकरे येत्या बुधवारी आणि गुरुवारी पूरग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत.