Uddhav Thackeray: पंढरपूरला येण्यासाठी वारकऱ्यांची विनंती, आषाढीला जाणार? उद्धव ठाकरेंचं मोठं विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2022 02:25 PM2022-07-08T14:25:01+5:302022-07-08T14:41:45+5:30
Uddhav Thackeray: वारकऱ्यांनी मला पंढरपूरला येण्याची विनंती केली आहे. विठू माऊली माझ्याही मनात आहे. मात्र या गदारोळात मी पंढरपूरला जाणार नाही. पण मी वारकऱ्यांनी केलेल्या विनंतीनुसार हा गदारोळ आटोपल्यानंतर मी पंढरपूरला विठुमाऊलीच्या दर्शनाला जाणार आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
मुंबई - शिवसेनेत झालेलं बंड मोडून काढण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी आघाडीवर येऊन बंडखोरांना आव्हान देण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, आज मातोश्रीवर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी अनेक मुद्द्यांवर स्पष्ट भूमिका मांडली आहे. यावेळी वारकऱ्यांनी मला पंढरपूरला येण्याची विनंती केली आहे. विठू माऊली माझ्याही मनात आहे. मात्र या गदारोळात मी पंढरपूरला जाणार नाही. पण मी वारकऱ्यांनी केलेल्या विनंतीनुसार हा गदारोळ आटोपल्यानंतर मी पंढरपूरला विठुमाऊलीच्या दर्शनाला जाणार आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
मातोश्रीवर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे म्हणाले की, तुम्हा सर्वांना सन्मानानं मातोश्रीवर बोलावलं आणि निमंत्रण मिळताच तुम्ही आलात. भविष्यातही बोलावल्यावर प्रेमानं याल, अशी अपेक्षा करतो. पुढच्या दोन तीन दिवसांवर आषाढी एकादशी आली आहे. लाखो भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जात आहेत. मलाही पंढरपूरला विठूमाऊलीच्या दर्शनासाठी येण्यासाठी वारकऱ्यांचे निरोप आले आहेत. विठू माऊली माझ्याही हृदयामध्ये आहे. मात्र मी या सर्व गदारोळात दर्शनाला येणार नाही. मी नंतर पंढरपूरला येऊन विठू माऊलीचं दर्शन घेईन.
दरम्यान, धनुष्यबाण हा शिवसेनेचाच आहे आणि तो शिवसेनेचाच राहील. तो शिवसेनेपासून कुणीही हिरावून घेऊ शकणार नाही. हे मी पूर्ण जबाबदारीने विधितज्ज्ञांकडून माहिती घेऊन सांगत आहे, असं उद्धव ठाकरे यांनी या पत्रकार परिषदेमध्ये ठामपणे सांगितले. तसेच उद्धव ठाकरे यांनी यावेळी बंडखोर आमदारांवर जोरदार टीका केली आहे. सन्मानानं येऊ म्हणून सांगता, मग मी वोलावलं होतं तेव्हा येऊन समोरा समोर का बोलला नाहीत. तुम्ही माझ्यावर प्रेम आहे म्हणून सांगता. भाजपाबरोबर युती करा म्हणून सांगता. मात्र याच पक्षातील अनेत नेत्यांनी आमच्या घराण्यावर पातळी सोडून टीका केली, तेव्हा तुमच्यातील एकाही का विरोधात काही बोलला नाही, असा खरमरीत सवालही उद्धव ठाकरे यांनी यावेळी विचारला.