Uddhav Thackeray: बंडखोरांना सावधानतेचा इशारा, भाजपवर जोरदार हल्ला; शिवसेनेचा 'सामना' रंगला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2022 09:37 AM2022-06-23T09:37:54+5:302022-06-23T09:46:30+5:30

महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा अंत काय होणार, हे कोणीच सांगू शकत नाही. त्यात आपले महामहिम राज्यपाल श्रीमान कोश्यारी यांना कोरोनाने ग्रासले.

Uddhav Thackeray: Warning to Eknath Shinde, strong attack on BJP, Shiv Sena's 'match' | Uddhav Thackeray: बंडखोरांना सावधानतेचा इशारा, भाजपवर जोरदार हल्ला; शिवसेनेचा 'सामना' रंगला

Uddhav Thackeray: बंडखोरांना सावधानतेचा इशारा, भाजपवर जोरदार हल्ला; शिवसेनेचा 'सामना' रंगला

Next

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगल्यावरुन पसारा गुंडाळत मातोश्रीची वाट धरली. राज्यातील जनतेला आणि शिवसैनिकांना आवाहन करत त्यांनी मी मुख्यमंत्रीपदाचा आणि शिवसेना पक्षप्रमुखपदाचाही आता राजीनामा द्यायला तयार असल्याचं म्हटलं. त्यानंतर, मुंबईतील मातोश्री बंगल्याबाहेर शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली होती. राज्यातील शिवसैनिकांत भावनिक वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच, शिवसेनेच्या मुखपत्रातून भाजपवर निशाणा साधत बंडखोर आमदारांना इशारही देण्यात आला आहे.   

महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा अंत काय होणार, हे कोणीच सांगू शकत नाही. त्यात आपले महामहिम राज्यपाल श्रीमान कोश्यारी यांना कोरोनाने ग्रासले. त्यामुळे राज्यातील विरोधी पक्षांची राजभवनातील लगबगही थोडी थांबली. राज्य सरकारचे नक्की काय होणार? यावर पैजा लागल्या आहेत. शिवसेनेत उभी फूट पडली, सरकार संकटात आले, आता काय होणार? यावर चर्चा झडत आहेत. राजकारणात सगळेच अस्थिर असते आणि बहुमत त्याहून चंचल असते. शिवसेनेच्या तिकिटांवर, पैशांवर, मेहनतीवर निवडून आलेले आमदार भाजपच्या पकडीत फसले. ते आधी सुरतला आणि नंतर विशेष विमानाने आसामला गेले. या आमदारांची इतकी पळापळ का सुरू आहे? शिवसेनाअंतर्गत ज्या घडामोडी सुरू आहेत. त्याच्याशी आपला संबंध नाही वगैरे मखलाशी भाजपने तरी करू नये, असे सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे. 

नितीन देशमुख हे अकोल्याचे आमदार सुरतवरून मुंबईस परतले आणि त्यांनी जे घडले, त्याबाबत धक्कादायक असे सत्यकथन केले. भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रात सत्तास्थापनेसाठी गुप्त बैठका सुरू केल्या आहेत. मुंबईतील 'सागर' बंगल्यावर उत्साहाच्या लाटा उसळल्या असून लाटेचा फेस अनेकांच्या नाकातोंडात गेला आहे, पण भाजप कोणाच्या बळावर सरकार स्थापन करू इच्छिते? नगरविकास मंत्री शिंदे व त्यांच्या सोबत असलेल्या आमदारांना आधी मुंबईत यावे लागेल. विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी महाराष्ट्रीय जनतेच्या नजरेस नजर भिडवून विधान भवनाची पायरी चढावी लागेल. शिवसेनेने उमेदवारी देऊन मेहनतीने निवडून आणले आणि आता शिवसेनेशी बेइमानी का करीत आहात? या प्रश्नाचे उत्तर द्यावे लागेल. विधिमंडळात काय व्हायचे ते होईल, पण मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांची लोकप्रियता शिखरावर आहे. लोकमानसात उद्धव ठाकरे प्रिय आहेत, असं लेखात म्हटलं आहे.

... तर जनता त्यांना पराभूत केल्याशिवाय राहणार नाही

शिवसेनेचे संघटन मजबूत आहे. त्याचमुळे 'वेगळा गट' करून आसामात गेलेल्या लोकांना आमदार-नामदार होता आले. हे सर्व आमदार पुन्हा निवडणुकीला सामोरे गेले तर जनता त्यांना पराभूत केल्याशिवाय राहणार नाही. याचे भान या मंडळींना नसेलच असे नाही. त्यामुळे हे शिवसेनेचे आमदार व नामदार पुन्हा स्वगृही परत येतील. प्रवाहात सामील होतील. आज जे भाजपवाले त्यांना तळहातावरील फोडाप्रमाणे जपत आहेत ते गरज संपताच पुन्हा कचऱ्यातच फेकून देतील. भाजपची परंपरा तर हीच आहे. त्यामुळे कोणी कितीही जोरबैठका मारत असले तरी वादळ सरेल व आकाश स्वच्छ होईल. महाराष्ट्रात नवे सरकार स्थापन करण्याचे स्वप्न कुणाला पडलेच असेल तर तो त्यांचा स्वप्नदोष.

शिवसेनेतील बंडाचा इतिहास तेच सांगतो

राज्यसभा, विधान परिषद निवडणुकीतील 'जादा' विजय कोणामुळे मिळाला हे आता उघड झाले. आता तर आमदारांना डांबून ठेवले आहे. दहशतीच्या तलवारीखाली ठेवले आहे हे परत आलेल्या नितीन देशमुखांनी स्पष्ट केले. शिवसेनेने असे अनेक प्रसंग पचवले आहेत, अशा संकटांच्या छातीवर पाय ठेवून शिवसेना उभी राहिली. जय-पराजय पचवले. सत्ता असली काय आणि गेली काय, शिवसेनेसारख्या संघटनेला फरक पडत नाही. फरक पडणार आहे तो भाजपच्या प्रलोभनांना व दबावास बळी पडलेल्या आमदारांना. शिवसैनिकांनी ठरवले तर हे सगळेच लोक कायमचे 'माजी' होऊ शकतील. यापूर्वीचा बंडाचा इतिहास तेच सांगतो. वेळीच सावध व्हा, शहाणे व्हा, असा सल्लाही लेखात शेवटी दिला आहे.
 

Read in English

Web Title: Uddhav Thackeray: Warning to Eknath Shinde, strong attack on BJP, Shiv Sena's 'match'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.