Uddhav Thackeray : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेल्या यशानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आत्मविश्वास आणखी वाढला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आता विधानसभा निवडणुकीसाठी रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. अशातच विधानसभेच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला आहे. एकतर तू राहशील नाहीतर मी अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना आव्हान दिलं आहे.
वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात ठाकरे गटाच्या शाखाप्रमुखांची बैठक पार पाडली. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. यासोबत उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा उल्लेख करत पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही ठाकरेंनी इशारा दिला.
"ग्रामीण भागामध्ये चोर कंपनीने आपल्या शिवसेना प्रमुखांचा फोटो लावला. काही जणांनी सांगितले की आम्हाला मतदान करणार होते पण चुकून त्यांना दिले. मशाल चिन्ह घरोघरी पोहोचली पाहिजेत. जायचं आहे तर उघडपणे जा आणि आत राहून दगाबाजी करु नका. शिवसैनिकांना सोबत घेऊन लढून जिंकून दाखवीन. अनिल देशमुखांनी सांगितले की मला व आदित्य ठाकरेंना आत टाकायचे डाव फडणवीस यांचे होते. सगळं सहन करुन मी हिंमतीने उभा राहिलो आहे. एक तर तू राहशील किंवा मी राहीन. आज माझ्याकडे चिन्ह, पैसा काहीच नाही. पण तुमच्या हिंमतीवर आव्हान देत आहे," असे उद्धव ठाकरे म्हणाले.
"आता लढाईला तोंड फुटलं आहे. लोकसभेत आणखी विजयाची अपेक्षा होती. अमोलही जिंकलाच आहे. अखिलेश, ममता बॅनर्जी यांची भेट झाली. अनेकजण बोलले की तुम्ही देशाला दिशा दाखवली. आम्ही असेच आहोत. वाकडे गेलात की तोडू. भाजप म्हणजे चोर माणसं, राजकारणातील षंढ माणसं आहे. असा नडलो की मोदींना घाम फोडला. नरेंद्र मोदींचे भाषण बघताना आता किव येते," अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला.