Aarey Forest : आरेतील मेट्रो कारशेडवरून सरकारला नाणारसारखे झुकवू, उद्धव ठाकरे यांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2019 06:33 AM2019-09-17T06:33:19+5:302019-09-17T06:33:56+5:30
Mumbai Metro: ‘जे नाणारचं झालं तेच आरेचं होणार’ असा इशारा देत, मेट्रोसाठी आरेमध्ये कारशेड कोणत्याही परिस्थितीत शिवसेना होऊ देणार नाही,
मुंबई : ‘जे नाणारचं झालं तेच आरेचं होणार’ असा इशारा देत, मेट्रोसाठीआरेमध्ये कारशेड कोणत्याही परिस्थितीत शिवसेना होऊ देणार नाही, असे उद्धव यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत बजावले. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी आरेतील मेट्रो कारशेडला तीव्र विरोध दर्शविलेला असताना, उद्धव यांनी मात्र त्या मुद्द्यावर मौन बाळगले असल्याची टीका माध्यमांतून होत असताना उद्धव यांनी सोमवारी आदित्य यांच्या भूमिकेचे जोरदार समर्थन केले. त्यामुळे भाजप-शिवसेना युतीमध्ये हा मुद्दा चांगलाच तणावाचा बनला आहे.
उद्धव यांनी आरेतील वृक्षतोडीला जोरदार विरोध करीत सत्तारूढ भाजपला इशारा दिला. मेट्रोच्या कारशेडसाठी आरेतील वृक्षतोडीला जाहीरपणे विरोध करून ते म्हणाले की, नाणार येथील तेलशुद्धीकरण प्रकल्पाचाही असाच आग्रह धरण्यात आला होता. त्याचे काय झाले तुम्हाला माहीत आहे. ‘जे नाणारचे झाले, तेच आरेचे होणार.’ कोकणातील महत्त्वाकांक्षी नाणार प्रकल्पास स्थानिकांचा विरोध असल्याचे सांगत, शिवसेनेने तीव्र विरोध दर्शविला होता आणि प्रकल्प रद्द करण्यास भाजप सरकारला भाग पाडले होते. लोकसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना युती करताना नाणार प्रकल्प रद्द करण्याची अट शिवसेनेने घातली होती आणि ती भाजपला मान्य करावी लागली होती.
उदयनराजेंचा अपमान नाही
शिवसेनेच्या मुखपत्रात साताराचे खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर बोचरी टीका केली आहे, याकडे लक्ष वेधले असता, उद्धव म्हणाले की, उदयनराजेंचा अपमान करण्याचा आमचा हेतू नव्हता. त्यांच्याकडून काही गोष्टींची अपेक्षा आहे. आपल्या माणसांकडून या अपेक्षा नाही करायच्या, तर कोणाकडून करायच्या, असा सवालही त्यांनी केला. शिवसेनेने विधानसभा निवडणूक लढू इच्छिणाऱ्यांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत, याकडे लक्ष वेधले असता, उद्धव म्हणाले की, नेमक्या कोणत्या मतदारसंघांसाठी मुलाखती झाल्या हे सांगता येणार नाही. युती होणार की नाही याबाबत त्यांनी, ‘आम्ही सोबत आहोत,’ एवढेच सांगितले.
कारशेड आरेमध्येच होणार!
कारशेडसाठी आवश्यक जागेचा इतर कोणताही पर्याय उपलब्ध नसल्याने आरेतील जागेवर कारशेड बांधणे हाच पर्याय आहे. यामुळे मेट्रो-३ ची कारशेड आरेमध्येच बांधणार असल्याचे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या (एमएमआरसी) संचालिका अश्विनी भिडे यांनी उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा स्पष्ट केले. आतापर्यंत ज्याप्रकारे आम्ही ३४ किमीपर्यंतच्या भुयारीकरणाचे काम पूर्ण केले तसेच कारशेड बांधण्याचे कामही पूर्ण करू. प्रकल्पाला विरोध करताना त्याची दुसरी बाजूही समजून घेणे आवश्यक असते, असेही भिडे म्हणाल्या.
>‘काश्मीरप्रमाणे अयोध्येतील राम मंदिरासाठी निर्णय घ्या’
जम्मू-काश्मीरसाठीचे ३७० कलम रद्द करताना केंद्र सरकारने जसे धाडसी पाऊल उचलले, तसेच पाऊल अयोध्येत राम मंदिराची उभारणी करण्यासाठी उचलत त्यासाठी कायदा करावा, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या वेळी केली. ते म्हणाले की, राम मंदिर हा आमच्या श्रद्धेचा आणि अस्मितेचा प्रश्न आहे. हा प्रश्न आम्ही सोडणार नाही. अयोध्येत राम मंदिरासाठी पहिली वीट लावण्याचे कामही आम्हीच करू, असे सांगून ठाकरे म्हणाले की, हा प्रश्न १९९० पासून प्रलंबित आहे आणि तो अधिक काळ रेंगाळत ठेवता कामा नये. राम मंदिरासाठी आता थांबायला वेळ नाही. न्यायदेवतेने लवकरात लवकर निर्णय द्यावा. निर्णय यायला उशीर लागत असेल, तर केंद्र सरकारने विशेष कायदा तयार करावा. काश्मीर प्रश्नासाठी जसे धाडसी पाऊल उचलले, तसेच राम मंदिरासाठी धाडसी पाऊल उचलावे, अशी मागणी उद्धव यांनी केली.