Join us

पैसे वाटणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांना सोडून देता, उद्धव ठाकरे यांचा पोलिसांना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2024 3:43 PM

...आमचे सरकार आल्यावर तुमचे काय करायचे ते बघतो, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला, प्रचाराच्या शेवटच्या दिवशी उत्तर-पूर्व मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार संजय पाटील यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते.

मुंबई: पैसे वाटणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांना सोडून दिले जाते आणि आमच्या शिवसैनिकांवर लाठीचार्ज केला जातो. महिलांना मारहाण केली जाते. ज्या पोलिसांनी आमच्या महिला कार्यकर्त्यांवर हात उचलला त्या पोलिसांची नावे मला पाहिजे आहेत. आमचे सरकार आल्यावर तुमचे काय करायचे ते बघतो, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला, प्रचाराच्या शेवटच्या दिवशी उत्तर-पूर्व मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार संजय पाटील यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते.

महायुतीचे उमेदवार मिहीर कोटेचा यांच्या मुलुंड येथील 'वॉर रूम' मधून शुक्रवारी रात्री पैसे वाटप होत असल्याचा आरोप करत ठाकरे गटाच्या कार्यकत्यांनी कोटेचा यांच्या कार्यालयावर धडक मारली होती. त्यावेळी दोन्ही बाजूंनी बरीच बाचाबाची झाली होती. वातावरण तंग झाल्याने पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला होता. यावेळी पोलिसांनी आमच्याच कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज केल्याचा आरोप ठाकरे गटाने केला होता, या घटनेचा धागा पकडत ठाकरे यांनी राज्य सरकारचा समाचार घेतला.

हे सरकार लवकरच जाणार असून उद्या तुमचे काय करायचे याचा निर्णय मी घेतल्याशिवाय राहणार नाही. आमच्याशी मस्तीत वागाल तर मस्ती कशी जिरवायची हे आमच्या शिवसैनिकांना चांगले माहीत आहे. आतापर्यंत सत्ताधाऱ्यांनी शासकीय यंत्रणेचा दुरुपयोग केला. भ्रष्टाचाराचे आरोप करायचे, त्या व्यक्त्तीला बदनाम करायचे. त्यानंतर आपल्या पक्षात घ्यायचे, मग त्याचा सन्मान करायचा असेच आतापर्यंत भाजप करीत आला आहे.- उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख, उबाठा शिवसेना

• निवडणूक काळात अनेक ठिकाणी पैशांचे वाटप करण्याच्या तक्रारी येत असून आहेत. ज्या वस्त्यांमधून भाजपला मतदान कमी होणार आहे त्या ठिकाणी भाजपचे लोक मतदारांना भेटून त्यांच्या बोटाला शाई लावत आहेत. ही शाई बाहेर आली कशी, असा प्रश्न आम्ही निवडणूक आयोगाला विचारला आहे. शिवसैनिकांनी सतर्क राहावे. ही प्रचाराची सभा नसून विजयाची सभा आहे. अच्छे दिनची सुरुवात ४ जूनपासून होणार आहे, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. 

टॅग्स :उद्धव ठाकरेशिवसेनालोकसभा निवडणूक २०२४