"उद्धव ठाकरे ९४३ दिवस मुख्यमंत्री, पण कायम आठवणीत राहील असा मोठा प्रकल्प उभारला का?"
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2022 09:06 AM2022-12-12T09:06:50+5:302022-12-12T09:07:24+5:30
मी ट्रोलर्सच्या उत्तराची प्रतिक्षा करत आहे असं सांगत कंबोज यांनी शिवसेना उबाठा गटाला चिमटा काढला आहे.
मुंबई - राज्यात हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं उद्धाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. नागपूर ते शिर्डी असा हा पहिला टप्पा आहे. समृद्धी महामार्गाच्या उद्धाटनाच्या निमिताने संधी साधून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला लगावला. त्यावर उद्धव ठाकरेंनीही हा मार्ग कुणी आपल्यामुळेच झाला असं समजू नये असं सांगत प्रत्युत्तर दिले होते. आता भाजपा नेते मोहित कंबोज यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
मोहित कंबोज यांनी ट्विट करत म्हटलंय की, उद्धव ठाकरे हे ९४३ दिवस राज्याचे मुख्यमंत्री होते. या काळात त्यांनी पुढाकार घेऊन महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने कुठला एकतरी प्रकल्प उभारला का? एखादा असा प्रकल्प ज्यामुळे इतिहासात त्यांची आठवण कायम राहील. मी ट्रोलर्सच्या उत्तराची प्रतिक्षा करत आहे असं सांगत कंबोज यांनी शिवसेना उबाठा गटाला चिमटा काढला आहे.
त्याचसोबत उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र समृद्धी महामार्गात अडथळा आणण्याचे प्रयत्न केले. मुंबईतील मेट्रो आरे कारशेड रोखले. नाणार तेल शुद्धीकरण प्रकल्पाला विरोध केला. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनला विरोध. वाधवान बंदराला विरोध केला. उद्धव ठाकरे हे विकासाच्या विरोधात का आहेत? असंही भाजपा नेते मोहित कंबोज यांनी विचारलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कंबोज यांनी ठाकरे गटाला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.
Shri Uddhav Thackeray Ji was Chief Minister of Maharashtra For 943 Days , Can He / Anyone Tell One Development Project For State Which He Has Initiated Or Started As Per His Vision For State , For Which History Will Remember Him !
— Mohit Kamboj Bharatiya - मोहित कंबोज भारतीय (@mohitbharatiya_) December 11, 2022
Will Be Waiting For Trollers Replies 🤣
देवेंद्र फडणवीस-उद्धव ठाकरेंमध्ये टोले-प्रतिटोले
समृद्धी महामार्गाची संकल्पना मांडली तेव्हा अनेकांना हा मार्ग होणारच नाही असे वाटले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे त्यावेळचे नेते तर मार्गासाठी अधिग्रहण सुरू असताना विरोध करायला गावांमध्ये जायचे, एकही इंच जमीन देऊ नका, असे आवाहन करत होते. मात्र सार्वजनिक बांधकाम खाते सांभाळणारे एकनाथ शिंदे यांनी गावांमध्ये जाऊन अधिग्रहणाच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी केली या शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर पंतप्रधानांच्या उपस्थितीत टीकेची झोड उठवली.
तर काहीजण म्हणतात, हे मीच केलंय अरे नाही बाबा. सरकार येत जात असतं. आजपर्यंत किती मुख्यमंत्री होते. यापुढेही किती होणार आहेत. पण याचा अर्थ असा नाही की ते होते तेव्हाच काम झालं. कुणी हा समज करून घेऊ नये की ते म्हणजेच सर्वकाही. तो काही जणांचा समज झालाय असा टोला उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लगावला.