Join us

Uddhav Thackeray: "नामांतर करण्याची गरजच काय, ते आहेच संभाजीनगर", मुंबईच्या सभेत औवेसींवरही हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2022 8:42 PM

विरोधकांच्या टीकेला उत्तर देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आज शिवसेनेची जाहीर सभा आयोजित केली आहे.

मुंबई : भाजप नेत्यांकडून सातत्याने होणारी टिका, राज ठाकरेंनी उपस्थित केलेल्या भोंग्याचा वाद आणि हिंदुत्त्वाचा मुद्दा. दुसरीकडे राणा दाम्पत्य आणि विरोधकांकडून सातत्याने शिवसेनेवर होणारी टिका, यावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जाहीर केल्याप्रमाणे आज मुंबईतील बीकेसी मैदानात त्यांची जोरदार सभा झाली. या सभेत पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंनी विकासकामांवर भाषण करत राज्य सरकारने केलेल्या कामांची माहिती दिली. त्यानंतर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर तोफ डागली.

विरोधकांच्या टीकेला उत्तर देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आज शिवसेनेची जाहीर सभा आयोजित केली आहे. या सभेच्या सुरुवातीलाच जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. 

उद्धव ठाकरेंनी हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरुन भाजपला लक्ष्य केलं. देवेंद्र फडणवीसांनी गदाधारी हिंदुत्वावरुन आम्हावर टिका केली. आमचं हिंदुत्व हे गधादारी होतं, तो गधा आम्ही आता सोडून दिलाय. आमच्यासोबत असलेले हे गाढवं होते, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपला गाढवं असे संबोधले. 1 मे च्या सभेत देवेंद्र फडणवीस मुंबई स्वतंत्र करणार असं म्हणाले. मात्र, ही मुंबई आम्हाला आंदण म्हणून मिळाली नाही. त्यामुळे, या मुंबईला तोडण्याचे प्रयत्न करणाऱ्यांचे तुकडे तुकडे केल्याशिवाय राहणार नाही, असे म्हणत भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. 

औरंगाबादमध्ये औवेसींच्या झालेल्या सभेचा उल्लेख करताना भाजपच्या ए.बी.सी. टीमा पुढे केल्या जातात. कुणाला थडग्यावर डोकं टेकायला लावतात, कुणाला घंटा बडवायला दिला जातो, तर कुणाला भोंगा दिला जातो. आमच्या संभाजीनगरमध्ये असे म्हणत संभाजीनगरचा उल्लेख करताना, नामांतर करण्याची गरजच काय, ते आहेच संभाजीनगर, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले. आम्ही काँग्रेससोबत गेलो म्हणून हिंदुत्व सोडलं नाही. आम्ही राष्ट्रवादीसोबत गेलो तर टिका आणि तुम्ही गेले तेव्हा काय? असे म्हणत पहाटेच्या शपथविधीवर उद्धव ठाकरेंनी भाजपवर हल्लाबोल केला.  

आदित्य ठाकरे काय म्हणाले

भाषणाच्या सुरुवातीलाच, मला सभास्थळी येताना माझे आजोबा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि माझी आजी मीनाताई ठाकरे या शिवसैनिकांच्या गर्दीत दिसली, असे म्हणत बाळासाहेबांची आठवण आदित्य यांनी काढली. त्यानंतर, राज्य सरकारने केलेल्या विकासकामांचा पाढाच त्यांनी वाचला. कोविड काळात, लॉकडाऊनमध्ये मुख्यमंत्र्यांच्या कामाची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. राज्य सरकारने याच बीकेसी मैदानात मोठं कोविड सेंटर उभारल्याची आणि धारावीतील परिस्थिती हाताळल्याची आठवण करुन दिली. आदित्य यांनी विकासाच्या मद्द्यावरुन भाषण केलं. शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेबांच्या आठवणीने आदित्य ठाकरेंनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. तर, ''रघुकूल रीत सदा चली आयी, प्राण जाए पर वचन न जाए,'' असे म्हणत प्रभू श्रीरामांच्या चौपाईने भाषणाचा शेवट केला.  

 

टॅग्स :उद्धव ठाकरेशिवसेनामुंबईदेवेंद्र फडणवीसऔरंगाबाद