कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसलेले उद्धव ठाकरे आठवे मुख्यमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2019 04:02 AM2019-11-30T04:02:59+5:302019-11-30T06:49:10+5:30
राज्य विधिमंडळाच्या विधानसभा किंवा विधान परिषद यापैकी कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसूनही मुख्यमंत्री होणारे उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे आठवे मुख्यमंत्री ठरले आहेत.
मुंबई : राज्य विधिमंडळाच्या विधानसभा किंवा विधान परिषद यापैकी कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसूनही मुख्यमंत्री होणारे उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे आठवे मुख्यमंत्री ठरले आहेत. इतरांहून ठाकरे यांचे आणखी एक वेगळेपण महणजे, इतर सातजण पूर्वी विधिमंडळ किंवा संसदेचे सदस्य राहिलेले होते. ठाकरे यांनी मात्र यापूर्वी कोणतीही निवडणूक लढविलेली नाही.
राज्यघटनेनुसार विधिमंडळाची सदस्य नसलेल्या व्यक्तिस मुख्यमंत्री होता येते. मात्र मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यापासून सहा महिन्यात विधिमंडळाच्या कोणत्याही एका सभागृहाचे सदस्य होणे बंधनकारक असते.
विधिमंडळाचे सदस्य नसूनही याआधी महाराष्ट्रात झालेले सात मुख्यमंत्री असे: बॅ. अब्दुल रहमान अंतुले (जून १९८०), वसंतदादा पाटील (फेब्रुवारी १९८३), शिवाजीराव पाटील निलंगेकर ( जून १९८५), शंकरराव चव्हाण (मार्च १९८६), शरद पवार (मार्च १९९३), सुशिलकुमार शिंदे (जानेवारी २००३) आणि पृथ्वीराज चव्हाण (नोव्हेंबर २०१०). १९८५ च्या निवडणुकीत निलंगेकर यांचे तिकीट कापले गेले होते. त्यांच्याऐवजी मुलगा दिलीप पाटील यांना काँग्रेसची उमेदवारी मिळाली होती.
यापैकी शंकरराव चव्हाण व पृथ्वीराज चव्हाण राज्यात मुख्यमंत्री होण्याआधी केंद्रात मंत्री होते तर वसंतदादा पाटील व सुशिलकुमार शिंदे लोकसभेचे सदस्य होते. पहिल्यांदा मुख्यमंत्री होण्यापूर्वी शरद पवार हे विधानसभेचे सदस्य होते. मुख्यमंत्री झाल्यावर अंतुले, वसंतदादा पाटील, निलंगेकर पाटील व शिंदे यांनी सहा महिन्यांच्या आत विधानसभेर निवडून येऊन तर शंकरराव चव्हाण व पृथ्वीराज चव्हाण यांनी विधान परिषदेचे सदस्य होऊन घटनात्मक बंधनाची पूर्तता केली होती. त्यानुसार ठाकरे यांना सहा महिन्याच्या आत कोणत्याही एका सभागृहाचे सदस्य व्हावे लागेल.