उद्धव ठाकरे आज वाराणसीत, मोदींचा उमेदवारी अर्ज भरताना राहणार उपस्थित
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2019 11:59 PM2019-04-25T23:59:50+5:302019-04-26T06:57:49+5:30
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उमेदवारी अर्ज भरताना वाराणसी येथे उपस्थित राहणार आहे.
मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उमेदवारी अर्ज भरताना वाराणसी येथे उपस्थित राहणार आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उद्धव ठाकरे यांना फोनवरुन वाराणसीत उपस्थित राहण्याचं निमंत्रण दिलं. यानंतर गुरुवारी रात्री उशीरा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व शिवसेना सचिव मिलींद नार्वेकर हे पुण्याहून वाराणसीसाठी रवाना झाले. तर वाराणसी येथे मध्यरात्री 12.30 वाजता पोहचले. वाराणसी विमानतळवर केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल,खासदार भुपेंद्र यादव,खासदार अनिल अगरवाल यांनी उद्धव ठाकरेंचे स्वागत केले. त्यानंतर वाराणसीच्या ताज हॉटेल मध्ये त्यांनी मुक्काम केला. सकाळी 10 वाजता उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत उमेदवारी अर्ज भरताना उपस्थित राहणार आहेत. तर दुपारी 1 वाजता उद्धव ठाकरे पुन्हा मुंबईसाठी परततील.
दरम्यान गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीमध्ये भव्य रोड शो काढून शक्तीप्रदर्शन केलं. बनारस हिंदू विद्यापीठाजवळील पंडित मदनमोहन मालवीय यांच्या पुतळ्याला अभिवादन करत मोदींच्या रोड शोची सुरुवात झाली. मोदींच्या रोड शोसाठी वाराणसीमध्ये भाजपाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. सुमारे सात किलोमीटरच्या रोड शोच्या माध्यमातून मोदी आणि भाजपाने जोरदार शक्तिप्रदर्शन केले. रोड शो समाप्त झाल्यानंतर नरेंद्र मोदींनी गंगा आरतीला उपस्थिती लावत गंगा आरती केली.यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत भाजपाचे अध्यक्ष अमित शहा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते. गंगा आरतीसाठी वाराणसीतील घाटांवर आकर्षक सजावट देखील करण्यात आली होती.
मै यहां आया नही हूं, मुझे मां गंगाने बुलाया है, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2014च्या लोकसभा निवडणुकीत या घोषणेचा वापर केला होता. 2019च्या लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा वाराणसी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरणार आहेत तत्पूर्वी भाजपानं पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी मेगा रोड शोचं आयोजन केलं होतं. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी विरोधकांना मोदी लाट आजही कायम आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला गेला.
वाराणसीत मोदींचे जोरदार शक्तिप्रदर्शन, गंगा आरतीत घेतला सहभाग