मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानिमित्त सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आलेत. त्यात मोदींच्या दौऱ्यासाठी भाजपा आणि शिंदे गटाने जोरदार तयारी केली आहे. मात्र मोदींचा दौरा झाल्यानंतर राज्यात पुन्हा राजकीय धमाका होईल आणि उद्धव ठाकरेंना धक्का बसेल असा दावा शिंदे गटाचे नेते आणि प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केला आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदे गट काय खेळी खेळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नरेश म्हस्के म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यानंतर ठाकरे गटाला पुन्हा धक्का बसू शकतो अशी चर्चा, कुजबुज सुरू आहे आणि चर्चा, कुजबुज हे कुठेतरी सत्य असल्याशिवाय होत नाही. फार मोठा धक्का बसणार आहे. आमच्यासोबत कोण खासदार, आमदार आहेत हे सगळे तुम्हाला लवकरच कळणार आहे. महाराष्ट्रातून पक्षप्रवेशासाठी रिघ लागली आहे. मुंबईत हजारोंच्या संख्येने लोक येतायेत. थोड्याच दिवसांत धमाका दिसेल आमदार, खासदार हेदेखील एकनाथ शिंदेंची वेळ मागतायेत असा दावा त्यांनी केला आहे.
४० आमदार अन् १३ खासदार शिंदेंसोबतमहाराष्ट्रात राजकीय सत्ता उलथवल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत सहभागी होणाऱ्या ठाकरे गटातील नेत्यांची संख्या वाढत आहे. आतापर्यंत ठाकरे गटाच्या १३ खासदारांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे तर ४० आमदार एकनाथ शिंदेंसोबत आहेत. त्यात आता उरलेल्या काही आमदार, खासदारांपैकी काहीजण शिंदे यांच्या संपर्कात असल्याचं बोलले जात आहे. आगामी महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरेंना धक्का देण्यासाठी ही रणनीती आखली जात आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदींचा दौरा संपल्यानंतर राजकीय हालचालींना आणखी वेग येणार असल्याचं बोलले जात आहे.
उद्धव ठाकरेंच्या हातून महापालिका जाणारमुंबई महापालिका आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे राहणार नाही ही काळ्या दगडावरील पांढरी रेघ आहे असा दावा शिंदे गटातील आमदार भरत गोगावले यांनी केला आहे. भरत गोगावले म्हणाले की, पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. ४५० किमी रस्ते सिमेंट कॉंक्रिटचे होणार आहेत. मागच्या सत्ताधाऱ्यांना का सुचलं नाही हे माहिती नाही. मुंबईतील रस्ते आता चांगले होतील. त्याचे श्रेय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना द्यावे लागेल. आपण काही करू शकलो नाही. त्यामुळे टीकाटीप्पणी करायची म्हणून करतात असा टोला त्यांनी ठाकरेंना लगावला.