Join us

येत्या रविवारी लोकाधिकार समिती महासंघाचे सुवर्ण महोत्सवी अधिवेशन उद्धव ठाकरे करणार मार्गदर्शन

By मनोहर कुंभेजकर | Published: February 07, 2024 4:44 PM

हे अधिवेशन यशस्वी करण्यासाठी महासंघाच्या संलग्न समित्यांचे कार्यकर्ते व पदाधिकारी सज्ज झाले आहेत.

मुंबई - शिवसेनाप्रणित स्थानीय लोकाधिकार समिती महासंघ यावर्षी चळवळीची ५० वर्षे पूर्ण करीत आहे. त्यानिमित्ताने स्थानीय लोकाधिकार समिती महासंघातर्फे अधिवेशन रविवार दि. ११ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ९ वा. पासून हुतात्मा बाबू गेनू गिरणी कामगार क्रीडा भवन, माँसाहेब सौ. मिनाताई ठाकरे फुल बाजाराशेजारी, सेनापती बापट मार्ग, एल्फिन्स्टन येथे संपन्न होत आहे. हे अधिवेशन यशस्वी करण्यासाठी महासंघाच्या संलग्न समित्यांचे कार्यकर्ते व पदाधिकारी सज्ज झाले आहेत.

लोकाधिकार महासंघाच्या सुवर्ण महोत्सवी अधिवेशनाचे उद्घाटन शिवसेना नेते, युवासेनाप्रमखं आदित्य ठाकरे यांच्या शुभहस्ते होणार असून लोकाधिकारच्या कार्यकर्त्यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मार्गदर्शन करणार आहे.

या स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाच्या अधिवेशनासाठी शिवसेना नेते, उपनेते, खासदार, आमदार, मुंबईतील पुरुष व महिला विभागप्रमुख यांना निमंत्रित करण्यात आले आहे. लोकाधिकार समिती महासंघाशी संलग्न असलेल्या विविध ३०० समित्यांचे ९ ते १० हजार सभासद, पदाधिकारी अधिवेशात उपस्थित राहणार आहेत. 

या सुवर्ण महोत्सवी अधिवेशनात गेल्या ५० वर्षातील लोकाधिकार समिती महासंघाच्या यशस्वी चळवळीचा आढावा घेण्यात येणार असून पुढील वाटचाली ठरविण्यात येणार आहे. लोकाधिकार महासंघाचे हे सुवर्ण महोत्सवी अधिवेशन यशस्वी करण्यासाठी महासंघाचे अध्यक्ष, शिवसेना नेते, खासदार  अनिल देसाई त्यांच्या नेतृत्वाखाली सरचिटणीस  प्रदिप मयेकर, कार्याध्यक्ष आमदार  विलास पोतनीस व आमदार  सुनिल शिंदे यांच्यासह महासंघाचे असंख्य कार्यकर्ते अहोरात्र मेहनत घेत आहेत.

अधिवेशन यशस्वी होण्यासाठी नियोजनासाठी विविध आस्थापनातील स्थानीय लोकाधिकार समित्यांवर जबाबदारी सोपविली आहे.

टॅग्स :मुंबईउद्धव ठाकरे