मुंबई - पुण्यातील एल्गार परिषदेत शरजील उस्मानी याने हिंदू समाजाबद्दल केलेल्या विधानावरुन आता भाजपा नेते चांगलेच संतापले आहेत. शरजीलने केलेली अवमानजनक, आक्षेपार्ह, गंभीर वक्तव्यांची तातडीने दखल घेऊन त्यावर राज्य सरकारतर्फे तातडीने आणि कठोरातील कठोर कारवाई करावी, अशी मागणी करणारे पत्र माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे. त्यानंतर, आता महाराष्ट्राचे भाजपाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही मुख्यमंत्र्यांना शरजीलवर कारवाईसाठी पत्र लिहिले आहे. पण, हे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना न लिहिता, योगी आदित्यनाथ यांना लिहिण्यात आले आहे.
शरजीलने हिंदूंना सडक्या बुद्धीचे म्हटल्यामुळे भाजपा नेते आक्रमक झाले आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रानंतर आमदार नितेश राणे यांनी ट्विट करुन, शरजील या कारट्याला आमच्याकडे सोपवा, एल्गार काय असतो ते दाखवून देऊ, असा दमच भरलाय. आता, चंद्रकांत यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहिले आहे.
''हिंदू समाजाविरोधात गरळ ओकणाऱ्या शरजील उस्मानीवर चाप बसवण्यासाठी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्याच्यावर कोणतीही कारवाई करणार नाही, ही खात्री असल्यामुळे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना मी पत्र लिहून त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे, असे ट्विट पाटील यांनी केले आहे. या ट्विटसोबत पत्रही शेअर करण्यात आले आहे.
काय म्हणाला होता शरजील
‘आज का हिन्दू समाज, हिंदुस्तान में हिंदू समाज बुरी तरीके से सड़ चुका है। ये जो लोग लिंचिंग करते हैं, कत्ल करते है, ये कत्ल करने के बाद अपने घर जाते है तो क्या करते होंगे अपने साथ? कोई नए तरीके से हात धोते होंगे, कुछ दवा मिलाकर नहाते होंगे। क्या करते है ये लोग की वापस आकर हमारे बीच खाना खाते है, उठते-बैठते है, फिल्में देखते है। अगले दिन फिर किसीको पकड़ते है फिर कत्ल करते और नॉर्मल लाईफ जीते है। अपने घर में मोहब्बत भी कर रहे है, अपने बाप का पैर भी छू रहे है, मंदिर में पूजा भी कर रहे है, फिर बाहर आकर यही करते है...’, असे वक्तव्य एल्गार परिषदेतील भाषणात शरगीलने केले होते.
वक्तव्य तपासल्यानंतरच कारवाई - गृहमंत्री
पुण्यातील एल्गार परिषदेत काही आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आले किंवा नाही याबाबतचा व्हिडीओ मागविण्यात आला आहे. आक्षेपार्ह वक्तव्य तपासले जात आहे. त्यानंतरच पुढची कारवाई केली जाईल, असे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले. त्या कार्यक्रमातील भाषणाचा व्हिडीओ मागविला आहे. त्याची रीतसर तपासणी करू. त्यानंतर काही आक्षेपार्ह आढळले तर कारवाई करू, असे देशमुख यांनी सांगितले.
देवेंद्र फडणवीस यांचं पत्र
या पत्रात देवेंद्र फडणवीस म्हणतात की, 30 जानेवारी 2021 रोजी पुणे येथे आयोजित एल्गार परिषदेत अलिगड मुस्लिम विद्यापीठातील माजी विद्यार्थी असलेल्या शरजील उस्मानी याने अतिशय गंभीर, धार्मिक तेढ वाढविणारे, आक्षेपार्ह आणि समस्त हिंदू समाजाचा अपमान करणारी विधाने केली आहेत. आजचा हिंदू समाज पूर्णत: सडलेला आहे, हिंदू समाज हत्या करतो, घरी जाऊन आंघोळ करतो, दुसर्या दिवशी पुन्हा हत्या करतो, अशाप्रकारची ही गंभीर विधाने आहेत.
एक युवक राज्यात येतो, छातीठोकपणे हिंदुत्त्वावर शिंतोडे उडवितो आणि डोक्यावर मिरे वाटून निघून जातो आणि त्यावर काहीही कारवाई होत नाही, हा प्रकार अतिशय आश्चर्यजनक आहे. समस्त राज्याच्या चिंता वाढविणारा आहे आणि सर्वांच्या माना शरमेने खाली घालायला लावणारा आहे. मला आशा आहे की, हे पत्र मिळताच त्याच्यावर गुन्हा दाखल करून, शरजीलच्या मुसक्या आवळत महाराष्ट्रात आणून, अशा विधानांचे परिणाम काय असतात, यासंदर्भात कायदेशीर कारवाई करून त्याला अद्दल घडवाल. खरे तर एल्गार परिषदेच्या माध्यमातून गेल्याही कालखंडात काय झाले, याची जाणीव असताना, अशा आयोजनांना पुन्हा परवानगी देणे, किती चूक होते, हेच शरजीलच्या विधानांतून दिसून येते. एखाद्या आयोजनाला परवानगी दिली, म्हणजे त्यात झालेले सारे प्रकार सुद्धा खपवून घ्यायचे, ही भूमिका योग्य नाही. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात कुणीही यावे आणि अशी विधाने करून वातावरण खराब करावे, हे आम्हाला मान्य नाही. ते आपल्यालाही मान्य नसेल, अशी अपेक्षा आम्ही महाराष्ट्रातील जनता आणि समस्त हिंदू समाज करतोय्. या प्रकरणात कठोरातील कठोर आणि तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी या पत्रातून केली आहे