उद्धव ठाकरे अयोध्येत सभा घेणार नाहीत- संजय राऊत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2018 09:21 AM2018-11-21T09:21:48+5:302018-11-21T10:53:56+5:30
25 नोव्हेंबरला उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार आहेत.
मुंबई- 25 नोव्हेंबरला उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार आहेत. त्यावेळी ते तिथे सभा घेणार असल्याचीही चर्चा होती. परंतु आता ते तिकडे जाऊन सभा घेणार नसल्याचं शिवसेनेनं स्पष्ट केलं आहे. अयोध्येत सभेसाठी परवानगी मागितलीच नाही, असं संजय राऊत म्हणाले आहेत. त्यामुळे अयोध्या दौऱ्यात उद्धव ठाकरेंची कोणतीही सभा होणार नाहीत. उद्धव ठाकरेंच्या नियोजित दौऱ्यात सभेचं आयोजन नाही. अयोध्येत राम मंदिर लवकर बांधावे ही शिवसेनेची जुनी मागणी धसास लावण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख येत्या 24 नोव्हेंबरला दुपारी खास विमानाने अयोध्येला जाणार आहेत.
चलो अयोध्येचा नारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात केला होता. त्यानुसार 25 नोव्हेंबरला चलो अयोध्या असा नारा देत शिवसेनेने राज्यात जोरदार शक्ति प्रदर्शन करत जय्यत तयारी सुरू केली आहे. उद्धव ठाकरे यांच्याबरोबर शिवसेनेचे निवडक 100 नेते अयोध्येला 24 तारखेला जाणार असून राज्यातून सुमारे 25000 शिवसेनेचे निवडक पदाधिकारी अयोध्येला जाणार आहेत. तर मुंबईसह राज्यातील शिवसेनेच्या आमदार व प्रमुख पदाधिकाऱ्यांवर राज्यातील महाआरतीची जबाबदारी टाकण्यात आल्याचे समजते.याव्यतिरिक्त राज्यातून हजारो शिवसैनिक अयोध्येला आपली वाहने, रेल्वे, विमानाने जाणार आहेत. रेल्वे आणि विमानाची सर्व तिकीटे आधीच संपली आहेत. उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची संपूर्ण जबाबदारी शिवसेनेचे संसदीय नेते संजय राऊत यांच्यावर आहे, तर लखनऊपासून ते अयोध्ये पर्यंतची जबाबदारी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री(उपक्रम)एकनाथ शिंदे यांच्यावर आहे. राज्यातून हजारो शिवसैनिक अयोध्येत जाणार आहेत.
तर 24 नोव्हेंबरला सायंकाळी 5 वाजता अयोध्येत शरयू तीरावर उद्धव ठाकरे महाआरती करणार असून याचवेळी राज्यातील 350 तालुक्यात सायंकाळी राज्यातील प्रमुख राम मंदिर व इतर मंदिरा समोर महाआरती होणार आहे. त्यानंतर ते पत्रकारांशी संवाद साधणार असल्याचीही माहिती मिळाली आहे. गेल्या साडेचार वर्षांपासून शिवसेना केंद्रात सत्तेत आहे. मात्र तरीही शिवसेनेच्या नेतृत्त्वाकडून कायम मोदी सरकारवर टीका केली जाते. मोदी आणि भाजपाला 4 वर्ष राम आठवला नाही. मात्र निवडणूक जवळ येताच त्यांना रामाची आठवण झाली, अशी टीका उद्धव यांनी दसऱ्या मेळाव्यात केली होती. यानंतर शिवसेनेकडून उद्धव यांच्या अयोध्या दौऱ्याची तयारी सुरू झाली. अयोध्येतील भाषण प्रभावी व्हावं, यासाठी उद्धव ठाकरेंनी हिंदीची शिकवणी सुरू केली आहे.
अयोध्येला निघालेल्या शिवसेनेचे संघाने टोचले कान
राम मंदिराच्या मुद्द्यावर अनावश्यक राजकारण केले जात आहे. मंदिराच्या विषयाला राजकीय व धार्मिक स्वरूप देऊ नये, असा टोला वैद्य यांनी शिवसेनेचा नामोल्लेख टाळून लगावला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे अयोध्येला जाणार आहेत. भार्इंदरच्या उत्तन येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत संघाची अखिल भारतीय कार्यकारी मंडळाची तीन दिवसांची बैठक झाली. या बैठकीची सांगता सरसंघचालक मोहन भागवत आणि कार्यवाह भय्याजी जोशी यांच्या उपस्थितीत झाली होती.