मुंबई - निवडणूक आयोगाचा निकाल काहीही लागला तरी उद्धव ठाकरे हेच आमचे पक्षप्रमुख राहतील. शिवसैनिक जोपर्यंत उद्धव ठाकरेंना पक्षप्रमुख मानतात तोवर कुणालाही त्यांच्या पदाला हात लावण्याची हिंमत नाही अशा शब्दात शिवसेना उबाठा गटाचे नेते अनिल परब यांनी शिंदे गटाला इशारा दिला आहे. २३ जानेवारी २०२३ रोजी उद्धव ठाकरे यांचा पक्षप्रमुखपदाचा कार्यकाळ संपणार आहे.
अनिल परब म्हणाले की, पक्षप्रमुखपदाचा कार्यकाळ संपला या तांत्रिक बाबी आहेत. याकडे आम्ही फारसं लक्ष देत नाही. निवडणूक आयोगासमोर याची लढाई सुरू आहे ती चालेल. आजही उद्धव ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत. उद्याही राहतील आणि कायम पक्षाचे प्रमुख राहणार आहेत. निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेचा हा फक्त भाग आहे. त्यामुळे पक्षप्रमुखपदाला आम्ही जोपर्यंत शिवसैनिक मानतो तोपर्यंत कुणालाही हात लावायची हिंमत नाही असं त्यांनी म्हटलं.
शिवसेना पक्षप्रमुखपदावरून सध्या शिंदे-ठाकरे गटात वाद निर्माण झाला आहे. २३ जानेवारी रोजी उद्धव ठाकरेंची पक्षप्रमुखपदावरील नियुक्तीची मुदत संपतेय. ५ वर्षापूर्वी पक्षाच्या कार्यकारणीत उद्धव ठाकरे यांची पक्षप्रमुखपदी निवड करण्यात आली होती. त्यानंतर आता या पदाची मुदत संपतेय मात्र शिवसेना कुणाची हा वाद निवडणूक आयोगाकडे प्रलंबित असल्याने सध्या पक्षांतर्गत निवडणुका घेणे ठाकरेंसमोर आव्हानात्मक आहे. त्यामुळे २३ जानेवारीनंतर उद्धव ठाकरे पक्षप्रमुखपदावर नसतील असं सांगितले जात आहे.
उद्धव ठाकरे पक्षप्रमुख राहतील की नाही याचा पेचमाजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षप्रमुखपदाची मुदत बाळासाहेबांच्या जयंतीला २३ जानेवारी रोजी संपत आहे. मुदत वाढवून देण्यासाठी तसेच पक्षांतर्गत निवडणूक प्रक्रिया राबविण्याबाबत निवडणूक आयोगाकडे केलेल्या अर्जावर कोणताच निर्णय न झाल्याने ठाकरे गटासमोर पेच निर्माण झाला आहे. पुढचे पाऊल काय टाकायचे, याबाबत खलबते सुरू झाली आहेत.
शिवसेनेच्या घटनेनुसार २०१८ साली झालेल्या पक्षांतर्गत निवडणूक प्रक्रियेनुसार ठाकरे यांच्याकडे एकमताने पक्षप्रमुखपद देण्यात आले होते. मात्र, आता शिवसेनेतच फूट पडल्याने शिवसेना आणि निवडणूक चिन्ह कुणाचे, असा वाद निवडणूक आयोगासमोर सुरू झाला आहे. आयोगाने दोन्ही पक्षांना आपली बाजू ३० जानेवारीपर्यंत लेखी स्वरूपात मांडण्यास सांगितले आहे. त्याआधीच पक्षप्रमुखपदाची मुदत संपत असल्याने त्यानंतर तांत्रिकदृष्ट्या उद्धव ठाकरे हे पक्षप्रमुख राहणार की नाहीत, असा पेच निर्माण झाला आहे.