Uddhav Thackeray : 'उद्धव ठाकरे लवकरच देशातील पहिल्या क्रमांकाचे मुख्यमंत्री ठरतील'
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2021 11:10 AM2021-08-18T11:10:53+5:302021-08-18T11:32:19+5:30
Uddhav Thackeray : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अनेकदा, जेव्हा जेव्हा असं सर्वेक्षण झालंय, तेव्हा टॉप 10 किंवा टॉप 5 मध्ये आले आहेत. काही काळापूर्वी ते टॉप 10 मध्ये होते, पण आज टॉप 5 मध्ये आले आहेत.
नवी दिल्ली - देशातील विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या लोकप्रियतेचा आणि कामगिरीचं सर्वेक्षण इंडिया टुडे या माध्यम समुहाच्या माध्यमातून करण्यात आलं होतं. त्यामध्ये, देशातील टॉप 5 मुख्यमंत्र्यांमध्ये शिवसेनेचे उद्धव ठाकरे आणि तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जींचा समावेश आहे. मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे हे चौथ्या क्रमांकाचे लोकप्रिय मुख्यमंत्री आहेत. याबाबत, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आनंद अन् अभिमान व्यक्त केला आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अनेकदा, जेव्हा जेव्हा असं सर्वेक्षण झालंय, तेव्हा टॉप 10 किंवा टॉप 5 मध्ये आले आहेत. काही काळापूर्वी ते टॉप 10 मध्ये होते, पण आज टॉप 5 मध्ये आले आहेत. आपल्या कार्यकुशलतेतून ते हळूहळू देशात पहिल्या क्रमांचे मुख्यमंत्री बनतील, असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.
उद्धव ठाकरेंनी गेल्या 2 वर्षांत राज्याच्या विकासासाठी आणि जनतेसाठी मोठं काम केलंय. कोविड काळात त्यांनी केलेल्या कार्याची दखल जगाने घेतली आहे, सर्वोच्च न्यायालयानेही घेतली आहे. राजकीय विरोधक काहीही म्हणतील. पण, देशातील जबरदस्त नेतृत्व म्हणून उद्धव ठाकरेंकडे पाहिले जात आहे. त्यामुळेच, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देशातील टॉप 5 मध्ये आल्याचा आम्हाला अभिमान आहे. लवकरच ते टॉप 1 मध्ये जातील, असेही राऊत यांनी म्हटलं आहे.
सर्वेक्षणात भाजपला चांगलाच झटका
या सर्वेक्षणात भाजपला चांगलाच झटका बसला आहे. देशातील सर्वात लोकप्रिय असलेल्या 11 मुख्यमंत्र्यांमध्ये 9 मुख्यमंत्री हे भाजपेत्तर पक्षाचे आहेत. योगी आदित्यनाथ यांनाही केवळ 29 टक्के लोकांची पसंती मिळाली आहे. देशातील सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या नावांच्या यादीत एम.के. स्टॅलिन यांना पहिली पसंती मिळाली आहे. दुसऱ्या क्रमांकावर नवीन पटनायक यांना स्थान मिळाले आहे. केरळचे पिनराईन विजयन, उद्धव ठाकरे आणि ममता बॅनर्जींना अनुक्रमे 3, 4 आणि 5 वे स्थान मिळाले आहे. अकरा जणांच्या या यादीत भाजपचे केवळ 2 मुख्यमंत्री असून हेमंत बिस्वा आणि योगी आदित्यनाथ यांना स्थान मिळाले आहे.