मुंबई- मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते आज 'सर्वांसाठी पाणी' या धोरणाचा शुभारंभ झाला. या धोरणांतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिका परिसरातील सर्व निवासी रहिवाशांना अधिकृतपणे शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे शक्य होणार आहे. उद्धव ठाकरेंनी मुंबई महापालिकेच्या कामाचं जाहीरपणे कौतुक केलं.
मी पक्का मुंबईकर आहे,नव्हे माझा जन्मच मुळी मुंबईत झाला आहे. मुंबईचा मला सार्थ अभिमान आहे. मुंबई महानगर पालिका चांगले काम करत असून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली पाहिजे असे सांगत त्यांनी पालिका आयुक्त डॉ.इकबाल सिंह चहल आणि त्यांच्या टीमचा त्यांनी मुक्तकंठाने गौरव केला. तसेच उद्धव ठाकरेंनी यावेळी विरोधकांचा देखील चांगलाच समाचार घेतला.
एक तर काम करू द्यायचं नाही आणि केलं तर भ्रष्टाचार झाला असं म्हणत ओरडत सुटायचं. राजकारणाला एक दर्जा असावा. भ्रष्ट्राचार झाला असा आव आणायचा, विरोधकांनी चांगल्या कामाच्या सूचना कराव्यात तर सरकारच्या चांगल्या कामाचे सुद्धा मोकळेपणाने सांगावे, असं मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं.
आगामी १४ मे रोजी उद्धव ठाकरेंची जाहीर सभा घेणार आहे. यावर देखील त्यांनी भाष्य केलं. आता सभेला तर सुरुवात झालेलीच आहे, १४ तारखेला तर मी सभा घेतोच आहे, पण ही सभा म्हणजे उठसूठ इकडे वार तिकडे वार असं नाही करणार, जे काय माझ्या मनात आहे ते मी बोलणार आहे. माझं काही तुंबलेलं नाही, पण मनामध्ये ज्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या गोष्टी सांगायच्या आहेत, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
शिवआरोग्य सेवा सुरू-
शिवआरोग्य सेवा येत्या जून महिन्यात पालिकेतर्फे सुरू करण्यात असून १३९ चाचण्या मोफत केल्या जाणार आहेत.तर येत्या वर्षभरात मुंबईत १०० नवीन केंद्र सुरू करणार असल्याची त्यांनी घोषणा केली. सध्या कडक उन्हाळा आहे.ग्लोबल वॉमिंगचें परिणाम आपण पाहात आहोत. त्यामुळे पर्यावरणाचा नाश करून मी कदापी विकास करु देणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.