सत्तेच्या लालसेपोटी उद्धव ठाकरे रामाला विरोध करणाऱ्यांबरोबर; पुष्करसिंह धामी यांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2024 06:16 AM2024-05-13T06:16:19+5:302024-05-13T06:17:27+5:30
मुंबई उत्तर मध्यमधील भाजपचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्या प्रचारासाठी उत्तराखंडचे मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते पुष्करसिंह धामी आले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : राम मंदिराच्या उभारणीत स्व. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे योगदान मोठे आहे. मात्र, त्यांचे पुत्र उद्धव ठाकरे सत्तेच्या लालसेपोटी भगवान रामाला विरोध करणाऱ्यांबरोबर गेले आहेत, अशी टीका उत्तराखंडचे मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते पुष्करसिंह धामी यांनी रविवारी येथे केली. प्रचारासाठी धामी मुंबई दौऱ्यावर आले असून, मुंबई-ठाण्यात ते महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करणार आहेत.
मुंबई उत्तर मध्यमधील भाजपचे उमेदवार ॲड. उज्ज्वल निकम यांच्या प्रचारासाठी धामी आले होते. विलेपार्ल्यात उत्तराखंडातील रहिवाशांच्या मेळाव्यात बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेची तोफ डागली. केंद्र सरकारने गेल्या दहा वर्षांत केलेल्या कामाचा पाढा त्यांनी यावेळी वाचला. यावेळची निवडणूक केवळ खासदार, पंतप्रधान निवडण्यासाठी नाही, तर तर देशाला नवी दिशा देणारी, विकसित भारत घडवणारी, देशाच्या भविष्याची आणि आपल्या सीमेवरील जवानांच्या अस्मितेची निवडणूक असल्याचे सांगत धामी यांनी निकम यांना निवडून देण्याचे आवाहन केले.
मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील कसाबला फासावर चढवले, मात्र तेव्हाचे काँग्रेस पक्षाचे सरकार त्याला वाचवत होते, अशी टीका करत निकम यांना मिळणारे एक एक मतदान हे मोदींना मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. मी पाकिस्तानातून आलो आणि आम्ही पोलिस अधिकाऱ्यांना मारले, असे खुद्द कसाबने आपल्या जबाबात सांगितले आहे. पहिल्यांदा पाकिस्ताननेही ते मान्य केले. पण, माझ्यावरच विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले, अशा शब्दात उज्ज्वल निकम यांनी काँग्रेसवर हल्ला केला.