उद्धव ठाकरेचं ते वागणं पचनी पडत नव्हतं, शरद पवारांचा आत्मचरित्रातून खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2023 01:27 PM2023-05-02T13:27:24+5:302023-05-02T22:51:48+5:30
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं, त्यानंतर काही दिवसांतच कोविडमुळे लॉकडाऊन लागले.
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष पदावरुन निवृत्ती घेत असल्याचा निर्णय जाहीर केला. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात लोक माझे सांगाती या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बोलताना शरद पवार यांनी आपली राजकीय वाटचाल सांगितली. शरद पवारांच्या या निर्णयामुळे राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा सुरू झाली आहे. मात्र, यासोबतच शरद पवार यांनी आत्मचरित्राच्या दुसऱ्या भागात लिहिलेल्या अनुभवावरुनही चांगलीच चर्चा होत आहे. शरद पवार यांनी पहाटेचा शपथविधी, महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील बंडावर या पुस्तकात भाष्य केलं आहे.
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं, त्यानंतर काही दिवसांतच कोविडमुळे लॉकडाऊन लागले. या काळात सर्वकाही वर्क फ्रॉम होम सुरू होतं. त्यात, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेही मंत्रालयात न जाता घरूनच काम करत असल्याची टीका विरोधकांकडून सातत्याने होत आहे. आता, शरद पवार यांनीही आपल्या पुस्तकातून उद्धव ठाकरेंच्या आजारपणावर आणि मंत्रालयातील भेटींवर भाष्य केलं आहे.
मंत्रालयात दोनवेळा जाणं पचनी पडेना
उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयात फक्त दोन वेळा जाणं, हे आमच्या फारसं पचनी पडणारं नव्हतं. रश्मी ठाकरे यांच्याशी बोलताना उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीचं वर्तमान कळत होतं, यावेळी मी वडिलकीच्या नात्यांने त्यांना भेटण्यासाठी मातोश्रीवर गेलो होतो, असे शरद पवार यांनी सांगितले. तसेच, उद्धव ठाकरे यांची प्रकृती, त्यांच्या डॉक्टरांच्या वेळा यामुळे त्यांना भेटण्यासाठी वेळ घ्यावी लागत होती, असा गौप्यस्फोटच पवार यांनी आपल्या पुस्तकातून केला आहे.
राज्याच्या प्रमुखाला राज्यातल्या घडामोडींची बितंबातमी हवी. त्यांचं यावर हारीक लक्ष हवं. उद्या काय होऊ शकेल. याचा अंदाज घेण्याची क्षमता हवी आणि त्यानुसार आजच काय पावलं उचलायला पाहिजेत, हे ठरलवायचं राजकिय चातुर्य हवं. या सर्व बाबतीत आम्हाला सर्वांनाच कमतरता जाणवत होती. अनुभव नसल्यानं हे घडत असलं, तरी ते टाळता आलं असतं, असे म्हणत पवार यांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वार प्रश्न निर्माण केले आहेत.
बाळासाहेबांसारखी सहजता जाणवली नाही
महाविकास आघाडी सरकार कोसळण्यापूर्वी निर्माण झालेल्या पेचप्रसंगात त्यांनी पहिल्याच टप्प्यात माघार घेतली. त्याचंही कारण शारीरीक अस्वास्थ्य हेच असावं. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री केल्यामुळे शिवसेनत वादळ माजेल, याचा आम्हला अंदाज नव्हता. हा असंतोषाचा उद्रेक शमवायला शिवसेना नेतृत्व कमी पडलं. बाळासाहेब ठाकरे यांच्याशी बोलताना असलेली सहजता उद्धव ठाकरे यांच्यासोबत संवाद साधताना कधी जाणवली नाही. संघर्ष न करता उद्धवनी राजीनामा दिल्यामुळे महाविकास आघाडीच्या सत्तेला विराम मिळाला, असेही शरद पवार यांनी पुस्तकातून सांगितलं आहे.