Join us

'उद्धव ठाकरेंचा विदेशात काळा पैसा, माझ्याकडील पुरावे ED ला देणार'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2021 8:19 PM

मुंबई हायकोर्टानं नवनीत राणा यांचं जातवैधता प्रमाणपत्र फेटाळून लावत दोन लाखांचा दंड ठोठावला होता. त्यासोबतच सहा आठवड्यात जातीचा दाखला व जातवैधता प्रमाणपत्र जमा करण्याचे आदेश दिले होते

ठळक मुद्देमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा काळा पैसा परदेशात आहे. हॅाटेल, घर स्वरूपात त्यांनी विदेशात संपत्ती कमावली आहे. माझ्याकडे ठाकरेंच्या काळ्या संपत्तीचे पुरावे असून लवकरच ईडी आणि सीबीआयकडे हे पुरावे देणार असल्याचे आमदार रवि राणा यांनी म्हटले.

नवी दिल्ली - अमरावती मतदारसंघाच्या अपक्ष खासदार नवनीत रवी राणा यांना सुप्रीम कोर्टानं मोठा दिलासा दिला आहे. नवनीत राणा यांचे जातवैधता प्रमाणपत्र रद्द करण्याच्या मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिली आहे. त्यामुळे नवनीत राणा यांच्या खासदारकीवर येणारं संकट तुर्तास टळलं आहे. त्यानंतर, प्रतिक्रिया देताना खासदार नवनीत राणा आणि आमदार रवि राणा यांनी शिवसेना व मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं.  

मुंबई हायकोर्टानं नवनीत राणा यांचं जातवैधता प्रमाणपत्र फेटाळून लावत दोन लाखांचा दंड ठोठावला होता. त्यासोबतच सहा आठवड्यात जातीचा दाखला व जातवैधता प्रमाणपत्र जमा करण्याचे आदेश दिले होते. नवनीत रवी राणा यांनी फसवणूक करून व बनावट कागदपत्रे सादर करून जात प्रमाणपत्र मिळवले आहे, असा ठपका न्यायालयाने ठेवला होता. कोर्टाच्या या निर्णयाविरोधात नवनीत राणा यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. त्यावरील सुनावणीत कोर्टानं आज हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. त्यानंतर, झी 24 तास वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना शिवसेनेवर टीका केली. तसेच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरही गंभीर आरोप केले आहेत. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा काळा पैसा परदेशात आहे. हॅाटेल, घर स्वरूपात त्यांनी विदेशात संपत्ती कमावली आहे. माझ्याकडे ठाकरेंच्या काळ्या संपत्तीचे पुरावे असून लवकरच ईडी आणि सीबीआयकडे हे पुरावे देणार असल्याचे आमदार रवि राणा यांनी म्हटले. तर, मला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या आशिर्वादानेच अडकविण्याचा डाव आखला जातोय, असे नवनीत कौर यांनी म्हटलं. महिलेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करण्यात येत असून मला जाणीवपूर्वक त्रास दिला जात आहे. आता, शिवसेनेच्या आनंदराव अडसूळ यांनी पराभव पचवायला पाहीजे, असेही नवनीत कौर यांनी म्हटलं आहे. 

दरम्यान, नवनीत कौर आणि रवि राणा सातत्याने शिवसेना आणि मुख्यमंत्री यांच्यावर टीका करत आहेत. यापूर्वीही 100 कोटींच्या खंडणीप्रकरणी संसदेत बोलताना खासदार कौर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं होतं.

टॅग्स :शिवसेनारवी राणानवनीत कौर राणाउद्धव ठाकरेब्लॅक मनी