चिन्ह जाताच उद्धव ठाकरेंचा शरद पवारांना फोन; 'सर्वोच्च' लढाईसाठी 'मार्गदर्शन पे चर्चा'?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2023 01:01 PM2023-02-20T13:01:33+5:302023-02-20T13:01:58+5:30
ठाकरे गटाकडून आज, सोमवारी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात येत आहे.
मुंबई - राज्यातील सत्तासंघर्षाचा खटला सुरू असताना आता निवडणूक आयोगाने शिंदे गटाच्या बाजूने दिलेल्या निकालाचा सामनाही सुप्रीम कोर्टात रंगण्याची शक्यता आहे. एकीकडे शिवसेनेने आयोगाच्या निकालाविरोधात कोर्टात दाद मागण्याची तयारी सुरू केली असून, त्याआधीच शिंदे गटाच्या वतीने कॅव्हेट दाखल केले आहे. आता, ही लढाई कोर्टात होणार असून तत्पूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे वरिष्ठांचा सल्ला घेत आहेत. महाविकास आघाडीचे शिल्पकार आणि देशातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी उद्धव ठाकरेंनी फोनवरुन चर्चा केल्याचे समजते. या प्रक्रियेतसंदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये संवाद झाल्याची माहिती आहे.
ठाकरे गटाकडून आज, सोमवारी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात येत आहे. शिंदे गटाकडूनही तातडीने हालचाल करीत शनिवारी सुप्रीम कोर्टात यावर कॅव्हेट दाखल करण्यात आले. आमचे म्हणणे ऐकल्याशिवाय ठाकरे गटाच्या याचिकेवर कोणताही निर्णय घेऊ नये, अशी विनंती शिंदे गटाने या कॅव्हेटच्या माध्यमातून केली आहे. तर, उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्याशी फोनवरुन यासंदर्भात चर्चा केल्याचे वृत्त टीव्ही ९ मराठीने दिले आहे.
दरम्यान, राज्यातील सत्तासंघर्षावर मंगळवारपासून सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. या खटल्याच्या गुणवत्तेच्या आधारे न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठ हे प्रकरण सात सदस्यांच्या घटनापीठाकडे सोपवते, की १६ आमदारांच्या अपात्रतेवर हेच खंडपीठ निर्णय देते याकडे सर्वांचे लक्ष आहे.
काय म्हणाले होते शरद पवार
सध्या जो काही धनुष्यबाण वाद सुरू आहे, यामध्ये मी पडणार नाही. यावर मी स्पष्टपणे सांगितले आहे अशा शब्दांत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केले. तर निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात उद्धव ठाकरे यांनी लवकरात लवकर सर्वोच्च न्यायालयात जावे, असे मत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केले होते.
शरद पवार यांचा दृष्टिकोन
महिनाभरापूर्वी माझ्या दोन्ही डोळ्यांचा प्रॉब्लेम झाला होता. तेव्हा डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करायचे ठरवले. एकाचवेळी दोन्ही डोळ्यावर शस्त्रक्रिया करा, असा माझा आग्रह होता. पण माझे दोन्ही डोळे बंद असतील, तर महाराष्ट्रात काय चालले आहे, हे मला दिसणार कसे? असा प्रश्न डॉक्टरांनाच पडला. पण शस्त्रक्रिया झाली. डॉक्टरांनी डोळ्यात काय बसवले माहीत नाही, पण आता मला व्यवस्थित दिसतेय. कोण काय करतेय हे वेगळे सांगायची गरज नाही...हा किस्सा शरद पवार यांनी इंदापूरच्या सभेत सांगितला आणि हास्यकल्लोळ झाला. शिवाय पवारांच्या बदललेल्या दृष्टिकोनाची चर्चाही रंगली.