मुंबई : मंदिर बांधण्याची वल्गना करत अयोध्येला गेलेल्या शिवसेना पक्षप्रमुखांनी केंद्र सरकारलाच मंदिर उभारण्याची तारीख विचारली. ठाकरे यांचा अयोध्या दौरा म्हणजे शिवसेनेची स्टंटबाजी असून स्टंटबाजीत आपण भाजपापेक्षा कमी नाही, हेच त्यांनी दाखवून दिले आहे. त्यामुळे उद्धव यांची ही अयोध्यावारी सहकुटुंब - सहपरिवार तीर्थयात्राच ठरली आहे, अशा शब्दांत विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी शिवसेनेवर निशाणा साधला.
उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना विखे म्हणाले की, मी कुंभकर्णाला जागे करायला आल्याचे विधान उद्धव यांनी केले. पण, केंद्रात आणि राज्यातही शिवसेना सत्तेत सहभागी आहे. त्यामुळे ते नेमके कुणाला जागे करतायत, असा सवाल करतानाच ‘पहले मंदिर, फिर सरकार’ या शिवसेनेच्या नाºयाचाही विखे पाटील यांनी समाचार घेतला. ‘पहले सरकार, फिर मंदिर’ अशीच शिवसेनेची परिस्थिती आहे. उद्धव ठाकरेंचा अयोध्या दौरा म्हणजे शिवसेनेचा एक स्टंट आहे. स्टंट करण्यात आपणही भाजपापेक्षा मागे नाही, हे सिद्ध करण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे. जपानच्या पंतप्रधानांसोबत मोदींनी गंगाघाटावर केली, तशीच आरती शरयूच्या तिरावर झाली पाहिजे, हा अट्टाहास उद्धव ठाकरेंनी यानिमित्ताने पूर्ण करून घेतला.
सध्या महाराष्ट्र दुष्काळाने होरपळून निघत आहे. लोक गाव सोडून स्थलांतर करीत आहेत. जनावरांना चारा-पाणी नाही. शेतकरी आत्महत्या करीत आहेत. अशा परिस्थितीत लोकांना दिलासा देण्याऐवजी इव्हेंट करणे हा जनतेचा विश्वासघात असल्याचे विखे पाटील म्हणाले. शिवसेनेची विश्वासार्हता आता संपली आहे. ते शेवटचा श्वास घेत आहेत. म्हणून ते राम-राम करायला लागले आहेत. आपले अस्तित्व टिकवण्यासाठी ही शेवटची धडपड आहे, अशीही टीका विरोधी पक्षनेत्यांनी केली.उद्धव ठाकरे मुंबईत परतलेराम मंदिर उभारण्याची मागणी करत अयोध्या दौºयावर गेलेले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे रविवारी सायंकाळी मुंबईत परतले. छत्रपती शिवाजी महाराज आंतराष्ट्रीय विमानतळावर एका खासगी विमानाने ते मुंबईत दाखल झाले. यावेळी त्यांच्यासोबत रश्मी ठाकरे, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे, आणि सचिव मिलींद नार्वेकर उपस्थित होते.ठाकरे यांचे विमानतळाबाहेर आगमन होताच शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. उद्धव यांच्या स्वागतासाठी राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते, खासदार विनायक राऊत, सचिव आदेश बांदेकर आदी नेते उपस्थित होते. विमानतळावरून मातोश्री या निवासस्थानी पोहचताच उद्धव यांनी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतीमेला वंदन केले. अयोध्या दौरा यशस्वी ठरल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.