Join us

विजयाचा अमरपट्टा घेऊन कुठलाच राजकीय पक्ष फिरू शकत नाही, चित्रकूटमधील भाजपाच्या पराभवावरुन उद्धव ठाकरेंचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2017 7:41 AM

मध्य प्रदेशातील चित्रकूटची जागेवर काँग्रेसचा विजय झाला. मात्र चित्रकूटचा पराभव हा भाजपला धक्का नाही. ती जागा काँग्रेसचीच होती, असे भाजपाकडून म्हटलं जात आहे. यावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाला सामना संपादकीयमधून टोला हाणला आहे.

मुंबई - मध्य प्रदेशातील चित्रकूटची जागेवर काँग्रेसचा विजय झाला. मात्र चित्रकूटचा पराभव हा भाजपला धक्का नाही. ती जागा काँग्रेसचीच होती, असे भाजपाकडून म्हटलं जात आहे. यावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाला सामना संपादकीयमधून टोला हाणला आहे.  ''चित्रकूटचा पराभव हा भाजपला धक्का नाही. ती जागा काँग्रेसचीच होती, अशी प्रवक्तेगिरी आता त्या पक्षाकडून सुरू आहे, पण इतर पक्षांच्या बाबतीत हे घडते तेव्हा भाजपची भूमिका वेगळी असते. म्हणजे मुंबईतील भांडुप महानगरपालिका पोटनिवडणूक झाली ती जागा शिवसेनेची नव्हती. पण तेथे शिवसेनेस धक्का, शिवसेनेची पीछेहाट झाली असा दांडिया खेळण्यात आला. मग आता तोच न्याय लावायचा झाला तर चित्रकूटच्या पराभवाने भाजपास धक्का बसला आहे. भाजपची पीछेहाट झाली आहे असे म्हणायला जागा आहे'', अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी भाजपावर टीका केली आहे. 

काय आहे आजचे सामना संपादकीय ?मध्य प्रदेशमधील चित्रकूटची जागा काँग्रेसने दणदणीत मतांनी जिंकली आहे. ही विधानसभेची पोटनिवडणूक होती. काँग्रेसचीच जागा काँग्रेसकडेच राहिली. त्यामुळे या पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झाला व त्यांनी खूप काही गमावले आहे असे मानायला आम्ही तयार नाही, पण काँग्रेसच्या पराभवाची मालिका खंडित होत आहे की काय, अशी भीती आम्हाला वाटत आहे. आधी पंजाबमधील गुरुदासपूर लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा दारुण पराभव झाला. विनोद खन्ना यांच्या निधनानंतर ही जागा रिकामी झाली होती व भारतीय जनता पक्षाने आर्थिकदृष्टय़ा अतिसक्षम उमेदवार येथे उभा करूनही ते अडीच लाखावर मताधिक्क्याने पराभूत झाले. महाराष्ट्रात नांदेड महानगरपालिका निवडणुकीतही भाजपास दारुण पराभवाचा सामना करावा लागला. आता चित्रकूटमध्येही तेच झाल्याने भाजपच्या पराभवाचा इजा बिजा तिजा झाला. याचा काय अर्थ घ्यायचा? आतापर्यंत असे घडत आले की, सर्वच निवडणुकांत फक्त भाजपच ‘लाभार्थी’ ठरत गेला व इतर पक्षांच्या पराभवाचा आनंद ढोलताशे-फटाक्यांच्या आतषबाजीत साजरा झाला. अनेक ठिकाणी तर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या‘मगरी’ जबडय़ातून भाजपने विजयश्री खेचून आणली व त्या विजयाचे श्रेय पंतप्रधान मोदी यांच्या कणखर, लोकप्रिय नेतृत्वास बहाल केले गेले. त्यामुळे चित्रकूटसारख्या जागेवर विजय मिळविणे भाजपास तसे अवघड नव्हते, पण तरीही काँग्रेसने त्यांची जागा राखली. चित्रकूट मतदारसंघ उत्तर प्रदेशच्या सीमेवर असल्याने उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य मोठ्या फौजफाटय़ासह ‘चित्रकूट’ विजयासाठी तंबू ठोकून बसले होते. स्वतः मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी ही जागा प्रतिष्ठेची केली होती. त्यांनीदेखील विजयासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती. तीन दिवस तेथे प्रचार केला होता. तरीही भाजप पंधरा हजारांवर मतांच्या फरकाने पराभूत झाला. या पराभवाचे दुःख आम्हाला आहे. अर्थात काँग्रेसचा असा विजय होणे हा शुभशकून नाही. गुजरात निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना हा निकाल आला. त्यामुळे काँग्रेसचे मनोबल वाढणार नाही की भाजपचे घसरणार नाही, पण राजकारणात जय आणि पराजयास महत्त्व असते.

विजयाचा अमरपट्टा घेऊन कुठलाच राजकीय पक्ष फिरू शकत नाही. त्यामुळे सत्ताकारणात जसे कोणीही अजिंक्य नसते तसाच कोणताही राजकीय पक्ष कायमचा संपत नसतो. चित्रकूटचा पराभव हा भाजपला धक्का नाही. ती जागा काँग्रेसचीच होती, अशी प्रवक्तेगिरी आता त्या पक्षाकडून सुरू आहे, पण इतर पक्षांच्या बाबतीत हे घडते तेव्हा भाजपची भूमिका वेगळी असते. म्हणजे मुंबईतील भांडुप महानगरपालिका पोटनिवडणूक झाली ती जागा शिवसेनेची नव्हती. काँग्रेसच्या उमेदवाराचे निधन होताच भाजपने त्याच उमेदवाराच्या सूनबाईस उमेदवारी देऊन तेथील विजय विकत घेतला, पण तेथे शिवसेनेस धक्का, शिवसेनेची पीछेहाट झाली असा दांडिया खेळण्यात आला. मग आता तोच न्याय लावायचा झाला तर चित्रकूटच्या पराभवाने भाजपास धक्का बसला आहे. भाजपची पीछेहाट झाली आहे असे म्हणायला जागा आहे. भाजपने गेल्या दोन-तीन वर्षांत देशभरात अनेक ठिकाणी ‘काँग्रेसयुक्त’ भाजपची मोहीम राबवूनही काँग्रेसमुक्त हिंदुस्थान होऊ शकला नाही. चित्रकूट विधानसभा पोटनिवडणुकीतही भाजपला काँग्रेसचा पराभव करता आला नाही. हे का घडत आहे?

टॅग्स :उद्धव ठाकरेमुंबईभाजपाशिवसेना