...मेरा भारत ‘महान’ आणि मेरा महाराष्ट्र त्यापेक्षा जास्त ‘महान’, उद्धव ठाकरेंची एकनाथ खडसे प्रकरणावरुन भाजपावर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2018 08:13 AM2018-05-03T08:13:18+5:302018-05-03T08:13:18+5:30
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून भाजपावर टीकास्त्र सोडले आहे.
मुंबई - भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना, भोसरी भूखंड खरेदी प्रकरणी पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने क्लीन चिट दिली आहे. जमीन खरेदी प्रकरणी खडसेंवरील आरोप सिद्ध न झाल्याचा अहवाल एसीबीने न्यायालयात सादर केला आहे. या निर्णयामुळे खडसे यांच्यासह त्यांची पत्नी मंदाकिनी, जावई गिरीश दयाराम चौधरी यांना मोठा दिलासा मिळाला आहे. यावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून भाजपावर टीकास्त्र सोडले आहे.
''सरकारच्या दबावामुळेच एकनाथ खडसे यांना क्लीन चिट मिळाल्याचा दावा श्रीमती अंजली दमानिया यांनी केला आहे आणि मुख्यमंत्री फडणवीस यावर ‘मौन’ धारण करून आहेत. खडसे यांच्याशी आमचे व्यक्तिगत वैर असण्याचे कारण नाही. ते सत्यवचनी असतील तर त्यांच्यावरील आरोप बिनबुडाचे ठरोत'', असे उद्धव ठाकरे म्हणालेत.
शिवाय, ‘टु जी’ घोटाळ्यातील सर्व आरोपी असेच बिनबोभाट सुटले आहेत. तसे खडसेही सुटले. मग त्यांच्यावरील आरोपांचे नक्की काय झाले, हे कुणी सांगू शकेल काय? आपल्या देशात हे घडू शकते, घडते. म्हणूनच मेरा भारत ‘महान’ आणि मेरा महाराष्ट्र त्यापेक्षा जास्त ‘महान’ असे म्हटले जात असावे!, अशा शब्दांत त्यांनी भाजपावर टीकादेखील केली आहे.
- काय आहे आजचे सामना संपादकीय?
कायद्याच्या चौकटीत व्यवस्थित बसवून अनेकांची गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांतून आपल्या देशात सुटका केली जाते. म्हणूनच आपला भारत देश महान असल्याचे नेहमीच म्हटले जाते. सीबीआय, लाचलुचपत प्रतिबंधक खाते (एसीबी) आदी यंत्रणांचा वापर अनेकदा यासाठीच केला जातो. जे आपले आहेत त्यांना सोडवा व जे सोयीचे नाहीत त्यांच्यावरील आरोपांच्या फायली सदैव उघड्या ठेवा असे राजकारणात घडत असते. माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना भोसरीतील जमीन खरेदी प्रकरणात आता क्लीन चिट मिळाली आहे. या जमीन खरेदीत गैरव्यवहार झाल्याचे पुरावे सापडत नसल्याचे ‘एसीबी’ने म्हटले आहे. याआधी काँग्रेसचे कृपाशंकर सिंह असेच कायद्याच्या चौकटीत राहून सुटले होते. आता एकनाथ खडसे यांना क्लीन चिट देऊन तपास यंत्रणांनी स्वतःच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. एकनाथ खडसे यांनी भोसरीच्या जमीन व्यवहारात गडबड केल्याचे पुरावे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी समोर आणले होते. त्यामुळे दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले होते आणि खडसे यांना अपमानास्पदरीत्या मंत्रीपदावरून जावे लागले होते. खडसे यांच्यावरील आरोप काय होता, तर खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी आणि जावई गिरीश चौधरी यांनी २८ एप्रिल २०१६ रोजी भोसरी एमआयडीसी येथील जमीन अब्बास रसूलभाई उकानी नामक मूळ जमीन मालकाकडून फक्त ३.७५ कोटी रुपयांना खरेदी केली होती.
जमिनीची किंमत बाजारभावाने सुमारे ३२ कोटी असताना ती अवघ्या तिनेक कोटी रुपयांना मंत्र्यांच्या नातेवाईकांना मिळते हा चमत्कारच म्हणावा लागेल. रेडी रेकनर दरापेक्षा खूपच कमी बाजारमूल्य दाखवून भोसरी येथील हा जमीन खरेदी व्यवहार झाल्याचा संशय होता व अंजली दमानियांनी त्यावर रान उठवले होते. एखाद्या सामान्य उद्योजक किंवा ग्राहकाला हा असा फायदा उपटता आला असता काय? खडसे हे महसूलमंत्री पदावर असल्यानेच त्यांना हे सर्व करता आले. पुढे याच मुद्दय़ावरून जो गदारोळ झाला त्यात सगळेच सामील होते. काँग्रेस किंवा राष्ट्रवादीच्या पुढाऱ्यांनीही विधिमंडळात खडसेंच्या राजीनाम्याची मागणी केली होती. अर्थात, त्याच पुढाऱ्यांना पुढे खडसे यांच्या बाबतीत प्रेमाचा कंठ फुटला आणि खडसेही अधूनमधून काँग्रेस किंवा राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर घुसून आपण भाजपातील अन्यायग्रस्त, पीडित व शोषित असल्याचे बोलू लागले हा भाग वेगळा. त्यातून खडसे आता भाजपमध्ये राहत नाहीत व खडसे यांचा ‘गेम’ वाजवणारे स्वपक्षीयच आहेत अशीही चर्चा सुरू झाली. एवढेच नव्हे तर खडसे यांचे मंत्रिमंडळात पुनर्वसन होईल की नाही यावर भाजपातच ‘बेटिंग’ सुरू झाले.
आता एसीबीने खडसेंना ‘क्लीन चिट’ दिल्यानंतरही ते ‘बेटिंग’ सुरूच राहणार आहे. कारण ते एसीबीने क्लीन चिट दिली असली तरी खडसे यांच्यावरील आरोपांची चौकशी करणाऱ्या झोटिंग समितीचे काय म्हणणे आहे ते पाहावे लागेल. या समितीचा अहवाल सरकारला सादरही झाला आहे. अर्थात, तो गृहीत धरायचा की नाही, त्याची दखल घ्यायची की मुख्यमंत्र्यांनीच एकदा म्हटल्याप्रमाणे तो ‘बेदखल’ होणार हे पुन्हा सरकारच ठरविणार असल्याने त्याबाबत काय होईल याचाही अंदाज येऊ शकतो. जे काय होते ते भविष्यात दिसेलच, पण खडसे यांना जशी ३२ कोटींची जमीन तीन कोटींत मिळाली तशा जमिनी सामान्य जनतेलाही कमी भावात मिळोत! सरकारच्या दबावामुळेच एकनाथ खडसे यांना क्लीन चिट मिळाल्याचा दावा श्रीमती अंजली दमानिया यांनी केला आहे आणि मुख्यमंत्री फडणवीस यावर ‘मौन’ धारण करून आहेत. खडसे यांच्याशी आमचे व्यक्तिगत वैर असण्याचे कारण नाही. ते सत्यवचनी असतील तर त्यांच्यावरील आरोप बिनबुडाचे ठरोत. त्यांनी सर्वकाही योग्य मार्गाने केलेच होते तर जो गदारोळ झाला, अवहेलना, अपमान सहन करावा लागला त्यास जबाबदार कोण? ‘टु जी’ घोटाळ्यातील सर्व आरोपी असेच बिनबोभाट सुटले आहेत. त्यातील काहींनी तर वर्षावर्षांचा तुरुंगवासही भोगला आहे. मात्र आता ते सगळे पुराव्याअभावी सुटले. तसे खडसेही सुटले. मग त्यांच्यावरील आरोपांचे नक्की काय झाले, हे कुणी सांगू शकेल काय? आपल्या देशात हे घडू शकते, घडते. म्हणूनच मेरा भारत ‘महान’ आणि मेरा महाराष्ट्र त्यापेक्षा जास्त ‘महान’ असे म्हटले जात असावे!