आता मनमोहन सिंग बोलू लागले व मोदी गप्प झाले, उद्धव ठाकरेंचा चिमटा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2018 07:59 AM2018-04-20T07:59:10+5:302018-04-20T08:18:29+5:30

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मौन बाळगण्यावर टीकास्त्र सोडले आहे. 

Uddhav Thackeray's comment on ex pm manmohan singh slams pm narendra modi | आता मनमोहन सिंग बोलू लागले व मोदी गप्प झाले, उद्धव ठाकरेंचा चिमटा

आता मनमोहन सिंग बोलू लागले व मोदी गप्प झाले, उद्धव ठाकरेंचा चिमटा

Next

मुंबई  - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मौन बाळगण्यावर टीकास्त्र सोडले आहे. कथुआ सामूहिक बलात्कार व उन्नाव सामूहिक बलात्कार घटनांवरुन देशभरात संताप व्यक्त केला जात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यावर मौन बाळगून होते. यावरुन माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मोदींना, 'नेहमी बोलत चला आणि वेळेवर बोलत जा!', असा सल्ला दिला. यावरुन उद्धव ठाकरे यांनीही पंतप्रधान मोदींना सामना संपादकीयमधून चिमटा काढला आहे. 

''मनमोहन सिंग यांनी जे सांगितले ते बरोबर असले तरी अर्धसत्य आहे. मोदी हिंदुस्थानात ‘मौनी बाबा’ असतात, पण परदेशी भूमीवर ते बोलके होतात. सध्या मोदी परदेश दौऱ्यावर आहेत. ते आधी स्वीडन दौऱ्यावर होते. तिथेही स्वदेशातील घटना व घडामोडींवर बोलले. आता ते लंडनला पोहोचले व तेथूनही त्यांनी स्वदेशवासीयांना संदेश दिला आहे. म्हणजे आमच्या पंतप्रधानांना देशातील बऱ्यावाईट घटनांविषयी ‘व्यक्त’ होताना पाहायचे असेल तर हिंदुस्थानची राजधानी लंडन, न्यूयॉर्क, टोकियो, पॅरिस, जर्मनी येथे हलवावी लागेल. ते शक्य नसेल तर दिल्लीचे रूपांतर हे सिनेमातील भव्य सेटप्रमाणे परदेशातील शहरात करावे लागेल'', अशा शब्दांत त्यांनी मोदींना चिमटा काढला आहे.  

काय आहे आजचे सामना संपादकीय?
मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान मोदी यांना टपली मारली आहे. सरदारजींचे विनोद हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला, पण मनमोहन सिंग हे विनोदाचे प्रतीक नव्हते. त्यांचे ‘मौन’ हा मात्र विरोधकांच्या दृष्टीने टीकेचा विषय बनला खरा. मनमोहन सिंग यांनी आता देशाच्या आजी पंतप्रधानांना सल्ला दिला आहे की, ‘मोदीजी नेहमी बोलत चला आणि वेळेवर बोलत जा! मी पंतप्रधान असताना सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘नेहमी बोलत चला’ असा सल्ला मला दिला होता. आता मोदी यांनी तोच सल्ला स्वतः आचरणात आणावा,’ अशी टपली मनमोहन सिंग यांनी मारली आहे. मनमोहन सिंग यांनी व्यक्त केलेली भावना प्रामाणिक आहे व हवाबाज भक्त सोडले तर संपूर्ण देशाची तीच भावना आहे. तरीही मनमोहन सिंग यांनी जे सांगितले ते बरोबर असले तरी अर्धसत्य आहे. मोदी हिंदुस्थानात ‘मौनी बाबा’ असतात, पण परदेशी भूमीवर ते बोलके होतात. स्वदेशात त्यांना बोलूच नये असे वाटते. येथे घडणाऱ्या घटनांचा त्यांना उबग येतो. मग ते परदेशात जातात व स्वदेशातील घटनांवर बोलतात. सध्या मोदी परदेश दौऱ्यावर आहेत. ते आधी स्वीडन दौऱ्यावर होते. तिथेही स्वदेशातील घटना व घडामोडींवर बोलले. आता ते लंडनला पोहोचले व तेथूनही त्यांनी स्वदेशवासीयांना संदेश दिला आहे. म्हणजे आमच्या पंतप्रधानांना देशातील बऱ्यावाईट घटनांविषयी ‘व्यक्त’ होताना पाहायचे असेल तर हिंदुस्थानची राजधानी लंडन, न्यूयॉर्क, टोकियो, पॅरिस, जर्मनी येथे हलवावी लागेल. 
ते शक्य नसेल तर दिल्लीचे रूपांतर हे सिनेमातील भव्य सेटप्रमाणे परदेशातील शहरात करावे लागेल. त्यासाठी भाजपवाल्यांना कला दिग्दर्शक नितीन देसाई यांची मदत घेता येईल. पंतप्रधान मोदी यांनी लंडन येथे जाऊन हिंदुस्थानातील ‘बलात्कार’ प्रकरणावर दुःख व्यक्त केले आहे. हा त्यांच्या संवेदनशील मनाचा भाग आहे. ते हळवे आहेतच व त्यांच्या मनात अन्यायाविरुद्धची ठिणगी पेटती आहे. परदेशात त्या ठिणगीचा भडका उडताना आपण पाहतो. पंतप्रधान मोदी यांनी लंडन येथे जाऊन सांगितले की, बलात्कार हा हिंदुस्थानी समाजावरील सर्वात मोठा कलंक असून अशा घटनांचे राजकारण करता कामा नये. (दिल्लीतील निर्भया प्रकरणात त्यांची भूमिका वेगळी होती).

ही संस्कृती बदलण्यासाठी आपल्याला पुढाकार घ्यावा लागेल. मुलींवरील बलात्कार हा चिंतेचा विषय असून ती देशासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. बलात्कारासारख्या घटनांवर देशाच्या पंतप्रधानांनी परदेशी भूमीवर बोलणे कितपत योग्य आहे? घरातली अब्रू घरातच ठेवायला हवी. स्वदेशातील बेइज्जतीच्या प्रकरणांची झाकली मूठ परकीय भूमीवर का उघडायची? हिंदुस्थानात भ्रष्टाचार, बलात्काराची प्रकरणे वाढत आहेत व देश असुरक्षित बनल्याचे चित्र परकीय भूमीवर का रंगवावे? मागे जपानला जाऊन पंतप्रधान स्वदेशातील काळा पैसा व भ्रष्टाचारावर बोलले. आधीच्या राज्यकर्त्यांशी तुमचे वैर असू शकते, काँग्रेस किंवा गांधी परिवार भाजपचे हाडवैरी असू शकतात. म्हणून परदेशी भूमीवर जाऊन देशातील घटनांवर बोलणे कुणालाही शोभत नाही. मणिशंकर अय्यर पाकिस्तानात जाऊन शेण खातात हा गुन्हा असल्याचे आपण मानतो. देशात महागाई वाढली आहे. नीरव मोदीसारखे लोक बँका लुटून परदेशात गायब झाले आहेत. विजय मल्ल्या तर लंडन येथेच आहे. 
हा सर्व लुटलेला पैसा गरीबांचा आहे, पण मल्ल्या व नीरव मोदी यांना आश्रय देणाऱ्यांच्या देशात आमचे पंतप्रधान जातात व येताना हात हलवत परत येतात. त्यावर टीका केलेली भक्तांना चालत नाही. यावर मोदी यांनी लंडन येथे शेक्सपियर, सॉक्रेटिस, जीझसच्या आवेशात सांगितले की, ‘‘लोक माझ्यावर दगड फेकतात, मी त्यांचाच उपयोग करून रस्ता तयार करतो.’’ हे टाळीचे वाक्य आहे, पण स्वदेशातील लोक टाळी वाजवायच्या मनःस्थितीत नाहीत. ‘‘अयोध्येत राममंदिरासाठी उत्तम दर्जाचे दगड पोहोचले आहेत व राममंदिर का बनत नाही?’’ हा प्रश्न जनतेप्रमाणेच सरसंघचालक श्री. मोहन भागवत यांना पडला आहे. कश्मीरातील तरुणांच्या हाती दगड आहेतच, पण आता स्वदेशातील दलितांनीही हाती दगड घेऊन दंगली पेटवायला सुरुवात केली आहे.

अशा सर्व दगडांचा मोदी रस्ता बनवीत आहेत. देशात अभूतपूर्व अशी चलनटंचाई निर्माण झाली आहे. अनेक मोठय़ा राज्यांतील ‘एटीएम’चे रिकामे डबे झाले आहेत, अर्थव्यवस्था कोसळत आहे व मोदी हे परदेशात जाऊन भावनांना वाट मोकळी करून देत आहेत. आता मनमोहन सिंग बोलू लागले व मोदी गप्प झाले. हा काळाने भाजपवर घेतलेला सूडच म्हणावा लागेल. ‘‘मला संसदेत फक्त पंधरा मिनिटे बोलू द्या, मोदींचा आवाज कायमचा बंद करून दाखवतो’’ अशी भाषा राहुल गांधी करू लागलेत. मोदी यांचा मनमोहन झाल्याचे हे प्रमाण आहे. एकतर राजधानी दिल्लीतून लंडनला हलवा नाहीतर दिल्लीत परदेशी देखाव्यांचा सेट उभारा. मोदींना बोलते करावेच लागेल.

Web Title: Uddhav Thackeray's comment on ex pm manmohan singh slams pm narendra modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.