नक्षलवादी 'कथित' मात्र हिंदू 'कट्टरपंथीय' याला काय म्हणायचं ?, उद्धव ठाकरेंचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2018 08:32 AM2018-08-30T08:32:15+5:302018-08-30T08:37:08+5:30
पुणे पोलिसांनी नक्षलवाद्यांचे ‘थिंक टँक’ असलेल्या पाच जणांना अटक केली. देशभरातून त्यांच्या समर्थनार्थ लोकं व्यक्त होत आहेत. यावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून ताशेरे ओढले आहेत.
मुंबई - पुणे पोलिसांनी नक्षलवाद्यांचे ‘थिंक टँक’ असलेल्या पाच जणांना अटक केली. देशभरातून त्यांच्या समर्थनार्थ लोकं व्यक्त होत आहेत. यावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून ताशेरे ओढले आहेत. ''पानसरे, दाभोलकरांचे प्राण घेणारे कोणीही असोत, त्यांना कठोर शासन व्हायलाच हवे. फक्त नगास नग उभे करून हिंदूंना दहशतवादी ठरवू नका इतकेच. कारण उद्या देशावर संकट येईल तेव्हा हिंदूंची सर्व मने आणि मनगटे अशा कारवायांमुळे आधीच विझून गेलेली असतील'', अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी इशारा देऊ केला आहे.
- सामना संपादकीयमधील ठळक मुद्दे :
- महाराष्ट्रात व दिल्लीत भारतीय जनता पक्षाचे राज्य असूनही ‘हिंदू दहशतवाद’ असल्याचे ढोल बडवले जात आहेत व त्याबाबत सरकारने खुलाहिंदुत्ववाद्यांना कुणी वालीच नाहीसा करणे गरजेचे आहे.
- अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा खून केला, त्याच पिस्तुलाने कर्नाटकात गौरी लंकेश, कलबुर्गी वगैरे लोकांना खतम केले आणि या मंडळींना पुणे, कल्याण वगैरे भागात बॉम्बस्फोट घडवायचे होते, असे आता एटीएसने न्यायालयास सांगितले आहे.
- जे जे हिंदू संस्कृतीविरोधात आहे ते ते या मंडळींना नष्ट करायचे होते व त्यांनी तशी सशस्त्र पक्की तयारी केली असल्याचे निवेदन पोलिसांनी न्यायालयासमोर केले. हे सर्व लोक एकमेकांशी ‘कोड्या’त म्हणजे सांकेतिक भाषेत संवाद साधत होते, असेही पोलिसांनी सांगितले आहे.
- आता जे लोक पकडले ते सर्व ‘सनातन’चे असल्याचे बोलले गेले, पण यापैकी एकही व्यक्ती आमची साधक नाही, असल्यास सिद्ध करा असे आव्हान ‘सनातन’च्याच मंडळींनी दिले आहे. त्यामुळे नेमके सत्य काय आहे याबाबत संशयाचे वातावरण निर्माण झाले व सध्या तरी ‘एटीएस’ सांगेल तेच खरे असे मान्य करावे लागत आहे. पुन्हा या सर्व मंडळींना अनेक प्रमुख व्यक्तींना उडवायचे होते, असेही सांगितले जात आहे. आता या प्रमुख व्यक्ती कोण, हा प्रश्नही उपस्थित झाला आहे.
- पंतप्रधान मोदी यांच्याही जीवाला धोका आहे आणि तसा कट रचला जात असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. त्याची संशयाची सुई माओवाद्यांकडे असल्याने माओवादी लोकांवर धाडी पडल्या. अर्थात माओवाद्यांकडे फक्त धमक्यांची पत्रे व कागदपत्रे सापडली, पण हिंदुत्ववाद्यांकडे मात्र बॉम्ब, बंदुका, स्फोटके सापडली.
- पुन्हा जे नक्षलवादी समर्थक मान्यवर आता पकडले गेले आहेत त्यांना ‘कथित’ नक्षलवादी समर्थक म्हटले जात आहे आणि अटकेत असलेल्या हिंदुत्ववादींचा उल्लेख मात्र थेट ‘हिंदू कट्टरपंथीय’ असा केला जात आहे.
- दाभोळकर हत्या प्रकरणात सीबीआयने जे आरोपपत्र दाखल केले आहे त्यात कोणी सारंग अकोलकर याचे नाव दिले आहे. मडगाव बॉम्बस्फोटातही त्याचे नाव संशयित म्हणून होते आणि तेव्हापासूनच तो ‘फरार’ घोषित आहे. मग आता पकडण्यात आलेले हे नवीन लोक कोण आहेत? हे सर्व लोक हिंदू दहशतवादी आहेत व त्यांना खतम केले पाहिजे असे सरकारने ठरवले आहे.
- मुळात हिंदूंना त्यांच्याच हिंदुस्थानात, खासकरून मोदी-फडणवीस यांच्या राज्यात दहशतवादी बनावे लागत असेल तर कमालच म्हणावी लागेल.
- हिंदुत्ववाद हा दहशतवाद किंवा कलंक नाही. शमीच्या झाडावरील शस्त्र देखील तो 14 वर्षे काढत नाही तिथे ही मिसरूड फुटलेली पोरे शस्त्रसाठा जमवतील काय? अर्थात पोलिसांनी कसून तपास करायला हवा.
- पानसरे, दाभोलकरांचे प्राण घेणारे कोणीही असोत, त्यांना कठोर शासन व्हायलाच हवे. फक्त नगास नग उभे करून हिंदूंना दहशतवादी ठरवू नका इतकेच आमचे सांगणे आहे. कारण उद्या देशावर संकट येईल तेव्हा हिंदूंची सर्व मने आणि मनगटे अशा कारवायांमुळे आधीच विझून गेलेली असतील.