मुंबई - अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली नाशिकहून निघालेला हजारो शेतकरी, शेतमजूर, कष्टकऱ्यांचा लाँग मार्च रविवारी मुंबईत दाखल झाला आहे. या मोर्चाला शिवसेना, मनेस, राष्ट्रवादी काँग्रेसनं पाठिंबा दर्शवला आहे. शेतक-यांच्या मोर्चला पाठिंबा दर्शवत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपा सरकारवर सामना संपादकीयमधून टीकास्त्र सोडले आहे. ''अर्थसंकल्पात फसव्या घोषणा करून सरकारने कष्टकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळले. धुळ्याचे एक शेतकरी धर्माबाबा पाटील मुंबईच्या मंत्रालयात आले व त्यांनी आत्महत्या केली. आता ‘जय किसान’चा नारा देत हजारो जिवंत धर्मा पाटील मंत्रालयाच्या दिशेने निघाले आहेत. त्यांचा आक्रोश आणि वेदना सरकारला बेचिराख केल्याशिवाय राहणार नाहीत'',अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.
काय आहे आजचे सामना संपादकीय?शेतकऱ्यांचा एक लाँग मार्च मुंबईच्या वेशीवर थडकला व आज तो महाराष्ट्राच्या विधिमंडळावर धडक देणार आहे. शेतकऱ्यांची ही ‘धडक’ अडवण्यासाठी सरकार पोलीस यंत्रणेचा कठोर वापर करील. त्यांना आझाद मैदान किंवा काळाघोड्य़ाची वेसही सरकार ओलांडू देणार नाही. आमच्या माहितीप्रमाणे पोलिसांकडून लोखंडी जाळ्य़ा, दंडुके, अश्रुधुराची नळकांडी यांचा चोख बंदोबस्त एव्हाना झाला असेल व त्यासाठी जादा पोलीस कुमक मुंबईत पोहोचली असेल याविषयी आमच्या मनात शंका नाही किंवा असेही घडू शकते की, मोर्चेकऱ्यांना भुलवण्यासाठी एखाद्या मंत्र्यास पाठवले जाईल व आश्वासनांच्या भूलथापा देऊन तो मोर्चाचा जोश तात्पुरता थंड करील, पण मोर्चेकऱ्यांची जिद्द अशी दिसत आहे की, त्या कोणत्याही भूलथापांना शेतकरी बळी पडणार नाहीत. शेतकऱ्यांचा मोर्चा नाशिकहून निघाला. हा मोर्चा कोणत्या विचारांचा, कोणत्या संघटनेचा, कोणत्या रंगाचा या चर्चेत पडायचे कारण नाही. तो शेतकरी आहे, कष्टकरी आहे. त्याला जात नाही, धर्म नाही व राजकीय विचार नाही. महाराष्ट्राच्या राजधानीत त्याचे स्वागत आम्ही करीत आहोत. ठाण्याच्या हद्दीत शिरताच या विराट बळीराजाचे स्वागत शिवसेनेने केलेच आहे. मुंबईतही कष्टकऱ्यांची शिवसेना तुमच्या स्वागतासाठी उभी आहे. शेतकऱ्यांच्या हातात लाल निशाण आहे. त्यामुळे शिवसेना त्यांचे स्वागत कसे करणार? हा प्रश्न मूर्खपणाचा आहे.
आमचे मतभेद असले तरी संयुक्त महाराष्ट्राच्या व खास करून मुंबईच्या लढ्य़ात हे लाल निशाण सक्रियपणे सहभागी झाले होते, हे विसरता येणार नाही. भाई श्रीपाद अमृत डांगे, अहिल्या रांगणेकर, शाहीर अण्णाभाऊ साठे हे सर्व कम्युनिस्ट विचारांचे पुढारी होते. मुंबईतला गिरणी कामगार व शेतकरी या महाराष्ट्राच्या लढ्य़ात रक्त सांडण्यासाठी सज्ज होता. हे कष्टकऱ्यांचे ऋण जो विसरला तो महाराष्ट्राचा दुश्मन मानावा लागेल. त्यामुळे सर्व राजकीय मतभेद दूर ठेवून आम्ही शेतकऱ्यांच्या मागण्यांना पाठिंबा देत आहोत. शेतकरी पिचला आहे, रोज आत्महत्या करतो आहे. सूर्य उगवताना आणि मावळताना रोज एक नवे संकट त्याच्या छाताडावर नाचत आहे. अशा शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करून त्यांचा सातबारा कोरा करा ही पहिली मागणी शिवसेनेची. त्यासाठी आम्ही रान पेटवले व सरकार गदागदा हलवले तेव्हा सरकारने कर्जमुक्तीची घोषणा केली, पण ही कर्जमुक्ती फसवी आहे. हजारो, लाखो शेतकरी कर्जमुक्तीच्या लाभापासून वंचित आहेत. कर्जमाफीतून शेतकऱ्यांच्या हाती फारसे काही लागले नाही व राजकीय लाभासाठी फक्त जाहिरातबाजी झाली. सरकारी धोरणे व नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी हतबल झाला आहे. सरकार फक्त तोंडाला पाने पुसत आहे. अर्थसंकल्पात शेतकऱयांच्या नावाने फक्त घोषणांची बोंब मारण्यात आली. ना कर्जमाफी ना नुकसान भरपाई. शेतकरी मोठ्य़ा संख्येने आत्महत्येच्या मार्गावरून निघाला आहे व त्याने क्रांतीची ठिणगीच टाकली आहे. शेतकऱ्यांनी आधी संप पुकारला.
आता सरकारचा निषेध करण्यासाठी हाच शेतकरी मुंबईत धडकला आहे. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसींचे काय झाले? शेतीमालाला दीडपट हमीभाव देण्याच्या घोषणेचे काय झाले? कसेल त्याची जमीन हा कायदा असेल तर मग कसत असलेल्या वन जमिनी शेतकऱ्यांच्या नावावर का होत नाहीत? आदिवासी शेतकरी जंगलात राहतो व वन जमिनींचे रक्षण करतो. त्या जमिनी आदिवासींच्या नावावर केल्या तर सरकारला अशी कोणती मोठी तोशीस पडणार आहे? असे एक ना अनेक प्रश्न घेऊन शेतकरी टळटळत्या उन्हात मुंबईत धडकत आहेत. एकीकडे महाराष्ट्राचे पाणी पद्धतशीरपणे गुजरातकडे वळवण्याचा घाट घातला जात आहे व दुसरीकडे बुलेट ट्रेनचा बुलडोझर शेतकऱ्यांच्या जमिनीवर फिरू लागला आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या व गरजा फार नाहीत. त्यांना फक्त सुखाने जगण्याचे स्वातंत्र्य हवे आहे. नोटाबंदीच्या गळफासात त्याची मान आजही अडकलेली आहे. त्याचे अर्थकारण उद्ध्वस्त झाले आहे. महागाई वाढली आहे. डिझेल, पेट्रोलचे भाव रोज वाढत आहेत. त्यामुळे शेतकरी व कामगारांच्या जीवनाची राखरांगोळी होत चालली आहे. अर्थसंकल्पात फसव्या घोषणा करून सरकारने कष्टकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळले. धुळ्य़ाचे एक शेतकरी धर्माबाबा पाटील मुंबईच्या मंत्रालयात आले व त्यांनी आत्महत्या केली. आता ‘जय किसान’चा नारा देत हजारो जिवंत धर्मा पाटील मंत्रालयाच्या दिशेने निघाले आहेत. त्यांचा आक्रोश आणि वेदना सरकारला बेचिराख केल्याशिवाय राहणार नाही.