सध्याच्या सरकारात मंत्री, खासदारांसहीत जनतेचेही कास्टिंग काऊच -उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2018 08:08 AM2018-04-27T08:08:01+5:302018-04-27T09:05:31+5:30

बलात्कार आणि कास्टिंग काऊचवरुन बॉलिवूडमधील कोरिओग्राफर सरोज खान यांनी वादग्रस्त विधान केल्यावर आता यावरुन सर्वच स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहेत.

Uddhav Thackeray's comment on renuka chaudhari's casting couch reaction | सध्याच्या सरकारात मंत्री, खासदारांसहीत जनतेचेही कास्टिंग काऊच -उद्धव ठाकरे

सध्याच्या सरकारात मंत्री, खासदारांसहीत जनतेचेही कास्टिंग काऊच -उद्धव ठाकरे

Next

मुंबई -   बलात्कार आणि कास्टिंग काऊचवरुन बॉलिवूडमधील कोरिओग्राफर सरोज खान यांनी वादग्रस्त विधान केल्यावर आता यावरुन सर्वच स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. 'प्रत्येक ठिकाणी कास्टिंग काऊच होतं. संसददेखील याला अपवाद नाही,' असं  रेणुका चौधरी यांनी म्हटले. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कास्टिंग काऊच प्रत्येक क्षेत्रात होतं, असंही चौधरींनी म्हटलंय. यावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून प्रश्न उपस्थित केले आहेत. शिवाय, भाजपावर सरकारवर टीकास्त्रही सोडले आहे. 
''संसदेत महिला खासदार आहेत तशा महिला अधिकारी व कर्मचारीही आहेत, पण ‘कास्टिंग काऊच’ची किंकाळी रेणुका चौधरींनी मारली आहे. त्यांच्या किंकाळीने फार तर त्यांच्या पक्षात खळबळ माजू शकेल. सध्याच्या सरकारात अनेक मंत्र्यांचे, खासदारांचे व जनतेचेही कास्टिंग काऊच चालले आहे. तेलुगू देसमचे कास्टिंग काऊच झाले म्हणून चंद्राबाबू सरकारमधून बाहेर पडले. कास्टिंग काऊच राजकारणात फक्त महिलांचेच होते असे नाही. सध्याच्या काळात ‘निर्भय’ कोणीच नसल्याने दडपण सहन करीत अनेकांचे जगणे सुरू आहे'', असे उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमध्ये म्हटले आहे. 

- काय आहे आजचे सामना संपादकीय?
काँग्रेसच्या नेत्या रेणुका चौधरी यांनी नेहमीप्रमाणेच काही फटाके फोडण्याचा प्रयत्न केला आहे, पण एक-दोन दिवसांच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या व सगळे हवेतच विरून गेले. रेणुका चौधरी यांनी असे सांगितले की, फक्त सिने उद्योगातच नाही, तर राजकारणातील स्त्रीयांनाही ‘कास्टिंग काऊच’चे शिकार व्हावे लागते. रेणुकाबाईंनी ‘संसदे’त महिलांचे कास्टिंग काऊच होते असा उल्लेख केल्याने थोडी खळबळ माजली. रेणुकांचे हे विधान बेजबाबदारपणाचे व समस्त महिलावर्गाचा अपमान करणारे आहे. रेणुका आधी तेलुगू देसम पक्षात होत्या व आता अनेक वर्षे त्या काँग्रेस पक्षात आहेत. खासदारकीपासून केंद्रीय मंत्रीपदापर्यंत अनेक जागांवर त्या विराजमान झाल्या. राज्यसभेतून आता त्या निवृत्त होताच त्यांना कास्टिंग काऊचची आठवण झाली. रेणुकांचे म्हणणे असे आहे की, कामाच्या ठिकाणी महिलांचे एक स्त्री म्हणून शोषण होतच असते. फक्त सिनेमातच नाही, तर संसदेतही हे घडते असा साक्षात्कार त्यांना झाला. हे सर्व संसदेत घडत असेल तर रेणुका आतापर्यंत गप्प का बसल्या? जर त्यांच्या डोळ्यांदेखत हे महिलांचे शोषण सुरू होते तर त्यावर त्यांनी संसदेत आवाज का उठवला नाही? राज्यसभेची जागा सोडावी लागल्यावरच त्यांना संसदेतील ‘कास्टिंग काऊच’चा सिनेमा का दिसला?

संसदेच्या कोणत्या दालनात हे रेणुका म्हणतात त्याप्रमाणे कास्टिंग काऊच चालले आहे याचा खुलासा सर्वप्रथम काँग्रेसने करायला हवा. संसद ही लोकशाहीचे पवित्र मंदिर आहे. या मंदिरातही ‘निर्भया’च्या किंकाळय़ा इतकी वर्षे घुमत आहेत, पण राज्यकर्ते मूकबधिर होऊन बसले आहेत. रेणुकांचे विधान त्यांनी एक स्त्री म्हणून केले आहे. त्यामुळे संसदेची पायरी चढणाऱ्या व तिथे वावरणाऱ्या प्रत्येक स्त्रीच्या बाबतीत चिंता करावी लागेल. संसदेत हल्ला करण्यासाठी घुसलेल्या अतिरेक्यांचा आपण खात्मा करू शकतो, पण महिलांचे कास्टिंग काऊच करणाऱ्यांना अभय व मानाच्या जागा मिळत असतील तर रेणुकांनी संसद आवारातील गांधी पुतळ्यापाशी आमरण उपोषण करायला हवे. रेणुका चौधरी म्हणजे राखी सावंत नाहीत. त्यामुळे त्यांनी केलेले आरोप मोदी सरकारला गांभीर्याने घ्यावे लागतील. संसदेतच कास्टिंग काऊच होते. ते कधीपासून सुरू आहे? संसदेत सर्वाधिक काळ काँग्रेसचे राज्य राहिले व आता चारेक वर्षांपासून भारतीय जनता पक्षाचे ‘मोदी सरकार’ सुरू आहे. त्यामुळे हे रेणुका उवाच कास्टिंग काऊच कोणत्या पुरातन काळापासून चालले आहे? आज संसदेच्या दोन्ही सभागृहांत महिला सदस्यांची संख्या मोठी आहे. त्यात सिने जगतापासून विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या महिलांची संख्या जास्त आहे. घरसंसार सांभाळून महिला समाजकारणात व राजकारणात काम करतात. 

रेणुका चौधरींच्या आरोपांचे शिंतोडे या समस्त महिलावर्गावर उडूच शकत नाहीत. रेणुकांचा आरोप स्वतःच्या काँग्रेस पक्षाविषयी असू शकेल व त्यांनी तसे स्पष्ट सांगायला हवे. राजकारणात पदे व ग्लॅमर मिळविण्यासाठी महिलांना मोठी किंमत चुकवावी लागते यावर श्रीमती सोनिया गांधींचे काय म्हणणे आहे? रेणुका चौधरी याआधी तेलुगू देसम पक्षात होत्या. तिथे त्यांना हा वाईट अनुभव आला की काँग्रेस पक्षात त्यांना ‘निर्भया’च्या किंकाळय़ा जास्त ऐकू आल्या? महिला सबलीकरणासाठी सर्वच सरकारे झटत आहेत. महिलांनी अनेक क्षेत्रांत पुरुषांना मागे टाकले ते काही कास्टिंग काऊचच्या जोरावर नाही. त्यामुळे रेणुकांचे हे विधान समस्त महिलावर्गाचा अपमान करणारे आहे. सिनेक्षेत्रात मुलींचे कास्टिंग काऊच होते, पण शेवटी हे क्षेत्र त्या मुलींचा सांभाळ करते व रोजगारही देते असे एक विधान सरोज खान यांनी केल्यावर रेणुकांनी त्यांचे मत मांडले. संसदेत असताना त्यांनी हे सत्य मांडले असते तर ते गांभीर्याने घेता आले असते. संसदेत महिला खासदार आहेत तशा महिला अधिकारी व कर्मचारीही आहेत, पण ‘कास्टिंग काऊच’ची किंकाळी रेणुका चौधरींनी मारली आहे. त्यांच्या किंकाळीने फार तर त्यांच्या पक्षात खळबळ माजू शकेल. सध्याच्या सरकारात अनेक मंत्र्यांचे, खासदारांचे व जनतेचेही कास्टिंग काऊच चालले आहे. तेलुगू देसमचे कास्टिंग काऊच झाले म्हणून चंद्राबाबू सरकारमधून बाहेर पडले. कास्टिंग काऊच राजकारणात फक्त महिलांचेच होते असे नाही. सध्याच्या काळात ‘निर्भय’ कोणीच नसल्याने दडपण सहन करीत अनेकांचे जगणे सुरू आहे

Web Title: Uddhav Thackeray's comment on renuka chaudhari's casting couch reaction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.