मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे बालेकिल्ला म्हणून ओळखले जाणारे गुजरात हे राज्य राखण्यात भाजपाला कसेबसे यश मिळाले असून, हिमाचल प्रदेश मात्र काँग्रेसने आपल्या हातातून गमावले आहे. मोदींनी गुजरात जिंकले पण, काठावरचे बहुमत मिळाल्यामुळे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हेच बाजीगर ठरले आहेत. गुजरातमध्ये भाजपाला १८२ पैकी जेमतेम ९९ जागा तर काँग्रेसने ८0 जागांवर यश मिळविले आहे. तिथे बहुमतासाठी ९२ जागांची गरज होती. यावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाला सामना संपादकीयमधून टोला हाणला आहे.
''देशाच्या पंतप्रधानांनाही शेवटी गुजरातच्या अस्मितेचेच कार्ड खेळावे लागले. ‘आपनो मानस’ म्हणूनच ९९ मतदारसंघांतील जनता मोदी यांच्या मागे उभी राहिली. पण किमान ७७ मतदारसंघांत राहुल गांधी व हार्दिक पटेल जोडीचा जय झाला. गुजरात व हिमाचलात भाजपचा विजय झाला, पण काँग्रेसचाही पराभव झाला नाही व काँग्रेसमुक्त हिंदुस्थानचे स्वप्न पूर्ण झाले नाही. सिंहाच्या कानफटात मारून माकडांनी धोक्याची घंटा वाजवली आहे. ‘हम करे सो कायदा’वाल्यांसाठी हा निर्वाणीचा इशारा आहे. गुजरात मॉडेल डळमळले आहे. २०१९ साली ते कोसळून पडू नये हीच सदिच्छा!'', अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी भाजपाला टोला हाणला आहे.
काय आहे आजचे सामना संपादकीय?गुजरातमध्ये भारतीय जनता पक्षाचा विजय झाला आहे. विजय होणारच होता व जल्लोषाचे ढोल वाजविण्याची तयारी आधीच सुरू झाली होती. पण जल्लोष करावा, बेभान होऊन नाचावे इतका देदीप्यमान विजय भारतीय जनता पक्षास खरोखरच मिळाला आहे काय? विजय भाजपचा झाला असला तरी चर्चा मात्र राहुल गांधी यांनी मारलेल्या झेपेचीच आहे. गुजरात आणि हिमाचल प्रदेशातील विजयाबद्दल आम्ही भाजपचे खास अभिनंदन करीत आहोत. त्याचबरोबर एक मजबूत विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसने जे यश संपादन केले तेसुद्धा महत्त्वाचे आहे. गुजरातेत भाजपला १५० पेक्षा एकही जागा कमी मिळणार नाही असे शेवटपर्यंत छातीठोकपणे सांगितले गेले. पण शंभराचाही आकडा गाठताना दमछाक झाली. किंबहुना शंभरचा आकडा गाठता गाठता भाजपचा घोडा मध्येच थांबतो की काय, अशीही एक वेळ आलीच होती. हिमाचल व गुजरातच्या निकालानंतर १९ राज्यांवर भाजपचा झेंडा फडकला आहे व काँग्रेस फक्त ५ राज्यांत म्हणजे ‘चिमूटभर’ उरली आहे. थोडक्यात, कधीकाळी काँग्रेसचे जे स्थान देशाच्या राजकारणात होते ते आता भाजपने घेतले आहे. गुजरात निवडणुकांच्या निकालांचे काय परिणाम होतील यावर चर्चेची गुऱ्हाळे आता सुरू आहेत. या निकालाचा अर्थ एका वाक्यात सांगायचा तर वारे बदलले नाहीत हे खरे, पण वारे मंदावले आहेत! उसळलेल्या लाटा थंडावल्या आहेत. अत्यंत परखडपणे बोलायचे तर, भाजप नेतृत्वासमोर राहुल गांधी, हार्दिक पटेल वगैरे कोण? ही तर माकडेच आहेत अशा ज्या वल्गना शेवटपर्यंत सुरू होत्या त्या मोडीत निघाल्या आहेत.
पुन्हा ज्यांनी या वल्गना केल्या त्यांना काठावर पास होऊनही ‘डिस्टिंक्शन’ मिळवल्याचे उसने अवसान आणावे लागत आहे. हे चित्र केविलवाणे आहे. २०१९ साली काय होणार याची ही नांदी आहे. आमच्या दृष्टीने ही धोक्याची घंटा आहे. पण ‘घंटा’ वाजवीत असतानाही विजयरथावर स्वार होण्यासाठी जे धडपडत आहेत त्यांनी गुजरात निकालाचा अर्थ समजून घेतलेला दिसत नाही. गुजरातच्या शहरी भागात भाजपचे यश मोठे आहे. सुरतसारख्या ठिकाणी व्यापारीवर्ग मोठा असल्याने नोटाबंदी व जीएसटीचा फटका बसेल असे वाटले होते. तेथेही भाजपचा शत-प्रतिशत विजय झाला. त्यामुळे नोटाबंदी किंवा जीएसटीचा फटका बसला नाही असे सांगायला ते मोकळे आहेत. पण संपूर्ण प्रचारात हे दोन्ही महत्त्वाचे विषय मागे पडले व मोदी यांच्यातर्फे भावनिक व गुजरातच्या अस्मितेवरच प्रचाराची राळ उडवण्यात आली. काही वेळा मोदी व्यासपीठावर रडलेदेखील. २२ वर्षांत गुजरातमध्ये भाजपने ‘विकास’ म्हणजे नक्की काय केले यावर कुणीही बोलायला तयार नव्हते व जाहीर सभांत पंतप्रधान गुजराती जनतेला भावनिक व अस्मितेची आवाहने करीत राहिले. वातावरण संपूर्ण विरोधात जात आहे हे दिसताच पाकिस्तान व हिंदू-मुसलमान हे मुद्दे जोरात प्रचारात आणले गेले. शेवटच्या दिवसांत हे केविलवाणे चित्र ज्यांनी पाहिले त्यांना भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे याची खात्री पटली. राहुल गांधी मंदिरात गेले यावरही भाजपकडून टीका झाली, पण हे प्रचाराचे मुद्दे होऊ शकतात काय यावर कुणीच बोलायला तयार नाही.
स्वतःच्याच गुजरात राज्यात पंतप्रधान मोदी यांना आव्हान उभे राहिले. पाटीदार समाजाचा तरुण नेता हार्दिक पटेल याने गावागावात जाऊन भाजपचे वस्त्र्ाहरण केले. तेव्हा हार्दिकला ‘नग्न’ दाखविणारी सीडी भाजपने समोर आणली. प्रचाराची पातळी इतक्या खालच्या पातळीवर जाणे हा लोकशाहीला धोका आहे. तरीही हार्दिकच्या सभांना शेवटपर्यंत प्रचंड गर्दी होत राहिली. हार्दिक पटेल व त्याचे साथीदार मजबुतीने काँग्रेसबरोबर उभे राहिले. राहुल गांधी यांनी या सर्व तरुण नेत्यांना बरोबर घेऊन गुजरातचे युद्ध लढले व ते जिंकता जिंकता थोडे मागे पडले, पण आर्थिकदृष्टय़ा, तसेच सत्तेच्या माध्यमातून ‘शक्तिमान’ असलेल्या भाजपला या पोरांनी जेमतेम शंभरीपर्यंत रोखले हा एकप्रकारे विजयच आहे. त्यामुळे विजयाचे ढोल वाजवणाऱयांनी सत्य व परिस्थितीचे भान ठेवले तर बरे होईल. देशाच्या पंतप्रधानांनाही शेवटी गुजरातच्या अस्मितेचेच कार्ड खेळावे लागले. ‘आपना माणस’ म्हणूनच ९९ मतदारसंघांतील जनता मोदी यांच्या मागे उभी राहिली. पण किमान ७७ मतदारसंघांत राहुल गांधी व हार्दिक पटेल जोडीचा जय झाला. गुजरात व हिमाचलात भाजपचा विजय झाला, पण काँग्रेसचाही पराभव झाला नाही व काँग्रेसमुक्त हिंदुस्थानचे स्वप्न पूर्ण झाले नाही. ‘हम करे सो कायदा’वाल्यांसाठी हा निर्वाणीचा इशारा आहे. गुजरात मॉडेल डळमळले आहे. २०१९ साली ते कोसळून पडू नये हीच सदिच्छा!