Join us

'सोळावं वरीस धोक्याचं' याप्रमाणे सोळावा विजय धोक्याचा ठरू नये,उद्धव ठाकरेंचा भाजपाला टोला 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2018 7:45 AM

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सामना संपादकीयमधून पुन्हा एकदा निशाणा साधला आहे.

मुंबई -  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सामना संपादकीयमधून पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. ''कर्नाटकच्या विजयाने भाजपाने १६ वे राज्य खिशात घातले व ही मोदींची लहर असल्याचे नव्याने सांगितले गेले. ही लहर मोदींची नसून कानडी जनतेची आहे'', असे उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमध्ये म्हटले आहे. आतापर्यंत देशातील २१ राज्ये भाजपाने जिंकली. त्यातील १५ राज्यांत त्यांची स्वबळावर सत्ता आहे. म्हणजे आता भाजपाचा विजय वयात आला आहे. तेव्हा त्यामुळे सोळावं वरीस धोक्याचं या गाण्याप्रमाणे सोळावा विजय धोक्याचा ठरू नये, असा इशाराही त्यांनी दिला आहे. 

काय आहे आजचे सामना संपादकीय ?कर्नाटकात भारतीय जनता पक्ष बहुमताच्या सीमारेषेवर जाऊन  थांबला. २२४ च्या विधानसभेत भाजपने १०४ जागा जिंकून विजय मिळवला. काँग्रेसचा घोडा ७८ जागांवर अडला. देवेगौडा यांच्या जनता दलाने ३८ जागा जिंकल्या. एखाद दुसरा अपक्ष वगळता इतरांना फारसे स्थान मिळाले नाही. महाराष्ट्र एकीकरण समितीचाही सीमा भागात दारुण पराभव झाला. तेथील मराठी बांधवांनी जणू ठरवूनच हा स्वतःचा पराभव घडवून आणला. कर्नाटकच्या विधानसभा निकालाचे हे चित्र स्पष्ट झाले आहे. कर्नाटकात राज्य भारतीय जनता पक्षाचेच येणार याविषयी आज खात्रीने कुणीच सांगू शकत नाही. गोवा, मणिपूर, मेघालय, नागालँडसारख्या राज्यांत साधे बहुमत नसतानाही तेथील राज्यपालांनी भाजपास सरकार स्थापनेचे निमंत्रण दिले होते. त्या मानाने कर्नाटकातील त्या पक्षाचा विजय बाळसेदार आहे. निकाल काही लागो आमचाच पक्ष किंगमेकरच्या भूमिकेत राहील असे श्री. देवेगौडा व त्यांचे चिरंजीव कुमारस्वामी कालपर्यंत सांगत होते. मात्र मतदारांनी त्यांना ‘किंगमेकर’पेक्षा मोठी भूमिका दिली आहे. कर्नाटकच्या विजयाने भाजपने १६ वे राज्य खिशात घातले व ही मोदींची लहर असल्याचे नव्याने सांगितले गेले. ही लहर मोदींची नसून कानडी जनतेची आहे. आली लहर केला कहर असे कानडी जनतेने दाखवून दिले. अर्थात सध्याची तेथील राजकीय अनिश्चितता पाहता भाजपने १६ वे राज्य खिशात घातले असे म्हणणे जरा  घाईचेच ठरेल.

आतापर्यंत देशातील २१ राज्ये भाजपने जिंकली. त्यातील १५ राज्यांत त्यांची स्वबळावर सत्ता आहे. म्हणजे आता भाजपचा विजय वयात आला आहे. तेव्हा त्यामुळे सोळावं वरीस धोक्याचं या गाण्याप्रमाणे सोळावा विजय धोक्याचा ठरू नये. कर्नाटकात काँग्रेसचा पराभव झाला याचा अर्थ मोदींची किंवा त्यांच्या पक्षाची लहर होती असे मानायला आम्ही तयार नाही. मोदी हे राष्ट्रीय राजकारणात नव्हते तेव्हाही भाजपने कर्नाटक जिंकलेच होते व ते राज्य संपूर्ण बहुमताचे होते. मावळत्या विधानसभेत भाजपचे ४० आमदार होते. त्यामुळे त्यांचे साठेक आमदार वाढले व काँग्रेसच्या जागा घटल्या. कुठल्याही सरकारविरुद्ध वातावरण हे निर्माण होतच असते. शेवटच्या काळात काँग्रेसने जे धर्माचे राजकारण केले ते त्यांना फटका देऊन गेले. निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसने स्वतंत्र लिंगायत धर्माचे राजकारण केले. हिंदू विरुद्ध लिंगायत अशी दुफळी माजवून राजकीय फायद्याचे गणित मांडले, ते साफ चुकले. लिंगायत समाजाचे प्राबल्य असलेल्या सर्व भागांतून भाजपला यश मिळाले. लिंगायत समाजानेच काँग्रेसचे हे राजकारण पायाखाली तुडवले. 

अर्थात ही खेळी सिद्धरामय्यांची होती व त्यांनी हा जुगार स्वत:च खेळला. सिद्धरामय्या यांना अतिआत्मविश्वास नडला.  त्यांनी मेहनत घेतली, पण प्रचाराची दिशा चुकली. त्यामुळे काँग्रेसला अनुकूल वातावरण असतानाही भाजपास लोकांनी मतदान केले. अर्थात कमी जागा जिंकूनही काँग्रेसच्या मतांची टक्केवारी घटलेली नाही व मोठा विजय मिळवूनही भाजपची टक्केवारी वाढलेली नाही. हे काही मोदी लहर असल्याचे लक्षण नाही. अर्थात भाजपने विजय मिळवला असला तरी विधानसभा त्रिशंकू आहे. काँग्रेस व देवेगौडांचा जनता दल एकत्र येऊन भाजपने पकवलेली खिचडी बिघडवू शकतात. भारतीय जनता पक्षाला मोठा विजय मिळाला हे मान्य, पण सत्तेची ‘हंडी’ त्यांच्यासाठी अद्याप लटकलेलीच आहे. त्यात काँग्रेसने देवेगौडांच्या पक्षाला सत्ता स्थापनेची आणि मुख्यमंत्रीपदाची ऑफर देऊन ही ‘हंडी’ आणखी वर नेऊन ठेवली आहे. काँग्रेस आणि देवेगौडांच्या पक्षाने राज्यपालांची भेट घेतली आहे. भाजपचे येडियुरप्पा यांनीही राज्यपालांची भेट घेतली आहे. त्यामुळे कर्नाटकातील सत्ताकारणाबाबत सध्या अनिश्चिततेची स्थिती आहे. कदाचित १०४ चा आकडा असून भाजप बाहेर आणि ३७ वाले मुख्यमंत्री पदावर अशाही परिस्थिती निर्माण होऊ शकते. अर्थात हीच तुमची बिन भरवशाची लोकशाही असल्याने हे किंवा आणखी काही वेगळे घडले तर त्यात आश्चर्यकारक नाही.

टॅग्स :कर्नाटक निवडणूक निकाल २०१८कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८उद्धव ठाकरे