Join us

उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार, विदर्भातील माजी मंत्री फोडला, संजय देशमुख १९ ऑक्टोबरला हाती शिवबंधन बांधणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2022 4:25 PM

Sanjay Deshmukh: आता उद्धव ठाकरे यांनीही भाजपावर पलटवार करण्यास सुरुवात केली आहे. भाजपामधील एक माजी मंत्री ठाकरेंच्या गळाला लागले असून, ते १९ ऑक्टोबर रोजी शिवबंधन बांधणार आहे. 

मुंबई - एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत बंड झाल्यानंतर भाजपाने या बंडाला प्रोत्साहन दिले होते. तसेच एकनाथ शिंदे यांच्यासोबत आलेल्या ४० आमदारांसोबत मिळून सरकारही स्थापन केले होते. त्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडून शिंदे गट आणि ठाकरे गट असे दोन गट तयार झाले आहेत. दरम्यान, आता उद्धव ठाकरे यांनीही भाजपावर पलटवार करण्यास सुरुवात केली आहे. भाजपामधील एक माजी मंत्री ठाकरेंच्या गळाला लागले असून, ते १९ ऑक्टोबर रोजी शिवबंधन बांधणार आहे. 

भाजपाचे नेते आणि माजी मंत्री संजय देशमुख हे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करणार हे आता निश्चित झाले आहे. संजय देशमुख हे १९ ऑक्टोबर रोजी शिवबंधन बांधणार आहे. यवतमाळमधील दिग्रस मतदारसंघात संजय देशमुख यांचा चांगला जनाधार आहे. तसेच संजय देशमुख हे शिंदे गटातील नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री संजय राठोड यांचे प्रतिस्पर्धी मानले जातात. त्यामुळे संजय देशमुख यांना पक्षात प्रवेश देऊन उद्धव ठाकरे हे संजय राठोड यांना शह देण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, संजय देशमुख यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश झाल्यानंतर काही काळात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे त्यांच्या मतदारसंघामध्ये जाहीर सभा घेण्याची शक्यता आहे. शिवसेनेतील फुटीनंतर अनेक नेते साथ सोडून जात असताना संजय देशमुख यांच्या पक्षप्रवेशामुळे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेनेला विदर्भात  मोठं बळ मिळण्याची शक्यता आहे. तर संजय देशमुखांच्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील प्रवेश हा भाजपासाठी धक्का मानला जात आहे.  

टॅग्स :उद्धव ठाकरेदिग्रसभाजपा